Advertisement

मुलुंडमध्ये ४० मॅनहोलची झाकणे चोरीला..कारवाई मात्र शून्य!

मुलुंडमध्ये भुरट्या चोरांनी पालिका प्रशासन आणि पोलिसांच्या नाकी नऊ आणले आहेत. मुलुंड परिसरात गेल्या महिनाभरात एक, दोन नाही तर तब्बल चाळीस ते पंचेचाळीस मॅनहोलची लोखंडी झाकणं या चोरट्यांनी लंपास केली आहेत.

मुलुंडमध्ये ४० मॅनहोलची झाकणे चोरीला..कारवाई मात्र शून्य!
SHARES

मुंबई शहरात मॅनहोलची झाकणं चोरीला जाणं हा प्रकार काही नवीन नाही. पण वर्षानुवर्षे भेडसावणाऱ्या या समस्येविरोधात प्रशासन अजूनही ठोस कारवाई करताना दिसत नाही. म्हणूनच मॅनहोल चोरीच्या गुन्ह्यांत वाढ झाली आहे. सध्या मुलुंडमध्ये याच प्रकरणी भुरट्या चोरांनी पालिका प्रशासन आणि पोलिसांच्या नाकी नऊ आणले आहेत. मुलुंड परिसरात गेल्या महिनाभरात एक, दोन नाही तर तब्बल चाळीस ते पंचेचाळीस मॅनहोलची लोखंडी झाकणं या चोरट्यांनी लंपास केली आहेत. रात्रीच्या अंधारात हे चोरटे मॅनहोलची झाकणं गायब करतात. पण याचा भुर्दंड मात्र नागरिकांना सोसावा लागत आहे.


Screenshot_20171123_143455.jpg


ही जबाबदारी कोणाची?

ही समस्या जुनीच असली, तरी त्यासंदर्भात प्रशासनाकडून कोणतीच ठोस भूमिका अद्याप घेतली गेली नाही. प्रत्येक मॅनहोलजवळ सुरक्षा रक्षक नेमणे शक्य नसले, तरी सीसीटीव्ही किंवा अन्य तंत्रज्ञानाचा उपयोग पालिका का करत नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ही नेमकी जबाबदारी कोणाची? यातच पोलिस आणि पालिका प्रशासन यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे. बुधवारी मुलुंडच्या भक्तीमार्ग परिसरात नीलिमा पुराणिक या ५३ वर्षीय महिला अशाच मॅनहोलमध्ये पडून जखमी झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना या मॅनहोलमधून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. नीलिमा यांच्यासारखे अनेक नागरिक सध्या झाकण नसलेल्या या उघड्या मॅनहोल्सचे शिकार होत आहेत. यासंदर्भात नागरिकांकडून पोलिस ठाण्यात तक्रारी देखील दाखल झाल्या आहेत. पण हे चोरटे काही मुलुंड पोलिसांच्या अद्याप हाती लागलेले नाहीत.


Screenshot_20171123_143428.jpg


तरीही होते झाकणांची चोरी

ज्या ठिकाणी मॅनहोल्सची झाकणं चोरट्यांनी लंपास केली, त्याठिकाणी दुसऱ्या दिवशी पालिका नवीन झाकण लावते खरी, पण त्यानंतरही झाकण पुन्हा चोरी होत असल्यामुळे पालिकेने या चोरट्यांपुढे अक्षरशः हात टेकले आहेत. दुसरीकडे हे चोरटे पोलिसांच्या अद्याप रडारबाहेरच असल्यामुळे नागरिक मात्र चांगलेच संतापले आहेत.


ज्या मॅनहोलची झाकणे चोरीला गेली, अशा सर्व मॅनहोलेवार प्लॅस्टिकची झाकणं लावली आहेत. यासंदर्भात पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी आपली गस्त वाढवून किंवा सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून यावर नियंत्रण मिळवले पाहिजे.

किशोर गांधी, अतिरिक्त आयुक्त, मुलुंड टी वॉर्ड


लोखंडाच्या जागी प्लास्टिकची झाकणे बसवली

एक लोखंडाचे झाकण भंगारात तीन ते चार हजाराला विकले जाते. त्यामुळे या चोरट्यांची चांदी झाली आहे. दुसरीकडे पालिकेला लाखो रुपयांचं नुकसान होत आहे. तात्पुरती उपाय योजना म्हणून पालिकेकडून त्या मॅनहोलवर एफआरबी म्हणजे प्लास्टिकची झाकणं बसवण्यात आली आहेत. परंतु, ही प्लॅस्टिकची झाकणं लोखंडी झाकणाच्या तुलनेत कमीच दर्जाची असतात. त्यामुळे या चोरट्यांना वेळीच वेसण घालणं गरजेचं आहे.


मॅनहोलची झाकणं चोरीला जात असतील तर ही जबाबदारी पालिकेची आहे. पालिकेनं या झाकणांना असे लॉक लावले पाहिजेत, जे फक्त पालिकेलाच उघडता आले पाहिजे. किंवा तशाच प्रकारचे अत्याधुनिक तंत्र वापरून पालिकेनं यावर आळा बसवला पाहिजे.

गोपाळ मिश्रा, स्थानिक



हेही वाचा

चर्नी रोड परिसरात ट्रक थेट मॅनहोलमध्ये घुसला

फायबरच्या झाकणाने घेतला अमरापूरकरांचा जीव?


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा