Advertisement

मेट्रो ३ साठी आरेतील ४४४ झाडांवर कुऱ्हाड?

आरे कॉलनीतील झाडांच्या कत्तलीला शिवसेनेचा विरोध कायम असून कापण्यात येणाऱ्या या सर्व ४४४ झाडांची पाहणी करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे.

मेट्रो ३ साठी आरेतील ४४४ झाडांवर कुऱ्हाड?
SHARES

मुंबई मेट्रो ३ अंतर्गत आरे कॉलनीतील झाडांची कत्तल करण्यात येत असल्यामुळे शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षांनी त्याला तीव्र विरोध केला. त्यानंतर आता एकूण झाडांपैकी ४४४ झाडांची कत्तल करण्यासाठी मेट्रोने नागरिकांकडून हरकती व सूचना मागवल्या आहेत. असे असताना, आरे कॉलनीतील झाडांच्या कत्तलीला शिवसेनेचा विरोध कायम असून कापण्यात येणाऱ्या या सर्व ४४४ झाडांची पाहणी करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. त्यानुसार येत्या १० नोव्हेंबरला महापौरांसह महापालिकेतील शिवसेनेचे नेते या सर्व झाडांची पाहणी करणार आहेत.


सुधार समितीकडून प्रस्ताव नामंजूर

मुंबई मेट्रो ३ च्या प्रकल्पासाठी आरे कॉलनीमध्ये मेट्रोचे कारशेड बांधण्यात येणार आहे. या कारशेडसाठी आरक्षणात बदल करण्याचा प्रस्ताव यापूर्वीच सुधार समितीने नामंजूर केला आहे. परंतु या कारशेडच्या बांधकामात आड येणाऱ्या ४४४ झाडांची कत्तल करण्याचा निर्णय मेट्रो रेल्वे घेतला असून याबाबत मेट्रो रेल्वेने या झाडांची कत्तल करण्यासाठी महापालिकेला प्रस्ताव पाठवला आहे. त्यानुसार महापालिकेने ‘आरे’ तील कत्तल करण्यात येणाऱ्या या झाडांसाठी लोकांकडून हरकती व सूचना मागवल्या आहेत.


सभागृहनेत्याचा विरोध

मुंबई महापालिकेच्या वृक्षप्राधिकरणाच्या बैठकीत उद्यान विभागाच्यावतीने प्रसिद्ध झालेल्या सूचनेबाबत सभागृहनेते यशवंत जाधव यांनी तीव्र विरोध दर्शवला. वृक्षप्राधिकरणाच्यावतीने सादर केलेल्या अर्थसंकल्पात ३७४ कोटींची शिल्लक दर्शवली आहे. ही शिल्लक झाडे कापल्यानंतर विकासक तसेच मालकांकडून महापालिकेकडे जी रक्कम भरली जाते, ती ही रक्कम असल्याचे यशवंत जाधव यांनी सांगितले. विकास कामांमध्ये झाडे कापल्यानंतर पुन्हा तिथे झाडेच लावली जात नाही. परिणामी भरलेली रक्कम पुन्हा मिळवली जात नाही. त्यामुळेच हा अर्थसंकल्प शिलकीचा दिसत असल्याचा आरोप जाधव यांनी केला.


७,८४२ झाडे कापली

मागील दोन वर्षांमध्ये ७ हजार ८४२ झाडे कापली गेली. परंतु त्यांच्या बदल्यात झाडे लावलीच गेली नाही. त्यामुळे वृक्षांचे संवर्धन होणे हे गरजेचे असून त्यासाठी मेट्रो कारशेडसाठी कापली जाणारी १३७ झाडे आणि येथीलच सारीपूत याठिकाणी कापली जाणारी ३०७ झाडे अशा एकूण ४४४ झाडांची पाहणी करण्याची मागणी आयुक्तांकडे केलेली असून महापौरांसह गटनेते, वृक्षप्राधिकरणाचे सदस्य यांच्यासह ही पाहणी येत्या १० नोव्हेंबरला दुपारी १२ वाजता केली जाणार असल्याचे यशवंत जाधव यांनी सांगितले.



हेही वाचा-

एक झाड तोडल्यास तीन नव्हे, दोनच झाडे लावणे बंधनकारक

झाडे कापण्यासाठी आता दोन सदस्यांच्या स्वाक्षरीची गरज नाही



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा