Advertisement

झाडे कापण्यासाठी आता दोन सदस्यांच्या स्वाक्षरीची गरज नाही


झाडे कापण्यासाठी आता दोन सदस्यांच्या स्वाक्षरीची गरज नाही
SHARES

मुंबईत विकास कामांकरिता कापण्यात येणाऱ्या आणि पुनर्रोपित करण्यात येणाऱ्या झाडांकरता वृक्ष प्राधिकरणाच्या दोन नगरसेवक सदस्यांची स्वाक्षरी घेतली जाते. परंतु यापुढे प्राधिकरणाच्या दोन सदस्यांची स्वाक्षरी प्रस्तावाकरता घेण्यात येणार नाही. महापालिका आयुक्त तथा वृक्ष प्राधिकरणाचे अध्यक्ष अजोय मेहता यांनी हा निर्णय घेतला आहे. अशाप्रकारे दोन सदस्यांची स्वाक्षरी घेण्याची तरतूदच अधिनियमात नसल्याचे सांगत आयुक्तांनी आपण हा निर्णय घेत असल्याचे शनिवारी झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीत स्पष्ट केले. त्यामुळे नगरसेवकांच्या हाती असलेला अधिकारच हातचा जाणार असल्याची चिन्हे आहेत.


नगरसेवकांचा अधिकार हिरावला जाणार

वांद्रे पूर्व येथील प्रस्तवित मेट्रो स्थानकाच्या बांधकामात आड येणारी बीकेसीतील झाडे कापण्याचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीपुढे मंजुरीला ठेवला होता. या प्रस्तावातील झाडांची पाहणी ही भाजपाचे गटनेते मनोज कोटक आणि नगरसेविका अलका केरकर यांनी केली होती. हे दोन्ही सदस्य भाजपचे असल्यामुळे याची पुन्हा पाहणी करण्याची मागणी सभागृहनेते यशवंत जाधव यांनी केली. त्यानंतर पवईतील लार्सन अँड टुब्रोच्या जागेत प्रशासकीय इमारत बांधकामाच्या आड येणारी झाडे कापण्यावरूनही सभागृहनेत्यांनी आक्षेप घेतला. यापूर्वीच्या सदस्यांनी झाडांची पाहणी केली असल्याने सभागृहनेत्यांनी याला आक्षेप घेतला. परंतु त्यानंतर पाच सदस्यांनी याची पाहणी केली. पण या पाहणीनंतरही सभागृहनेत्यांनी याला विरोध केला. त्यामुळे आयुक्तांनी यापुढे सदस्यांची स्वाक्षरी झाडे कापण्याच्या प्रस्तावावर घेण्यात येणार नसल्याचे जाहीर करून टाकले आहे. त्यामुळे सभागृहनेत्यांच्या आतातायी स्वभावामुळे नगरसेवकांच्या हातातील अधिकाराचे अस्त्र प्रशासनाने हिरावून घेण्यास सुरुवात केली आहे.


मेट्रोचा झाडे कापण्याचा प्रस्ताव ठेवला राखून

वांद्रे पूर्व येथील बीकेसीतील इन्कम टॅक्स इमारतीशेजारील जागेत मेट्रो रेल्वेच्या स्थानकाचे बांधकाम केले जाणार आहे. या बांधकामाच्या आड येणारी ८४ झाडे पुनर्रोपित करण्यास आणि ७० झाडे कापण्यास तसेच १४ झाडे आहे तशीच ठेवण्याचा प्रस्ताव मंजुरीला आला असता, याला सभागृहनेत्यांनी हरकत घेत याची पुन्हा पाहणी करण्याची मागणी केली. या झाडांची पाहणी भाजपाच्या दोन सदस्यांनी केल्यामुळे आपण याची पाहणी करणार असल्याचं सांगत तीव्र विरोध केला. त्यामुळे हा प्रस्ताव प्राधिकरणाचे अध्यक्ष अजोय मेहता यांनी राखून ठेवला.


एल अँड टीतील झाडे अखेर कापणार

पवईतील तुंगा आणि पासपोली गावातील लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या कार्यालयाच्या बांधकामाच्या आड येणाऱ्या ३७९ झाडांपैकी १९२ झाडांचे पुनर्रोपण आणि ८३ झाडे कापण्याचा प्रस्ताव जून महिन्यात मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे. ही झाडे विनापरवानगी कापण्यात आल्यामुळे या कंत्राटदाराविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या झाडांची पूर्वी रमेश कोरगावकर, धनंजय पिसाळ, देवेंद्र आंबेरकर, तृष्णा विश्वासराव आणि अनिषा माजगावकर आदी सदस्यांनी पाहणी केली. परंतु याला सभागृहनेत्यांनी आक्षेप घेतल्यानंतर पुन्हा विद्यमान पाच सदस्यांनी पाहणी केली. परंतु याला पुन्हा सभागृहनेत्यांनी विरोध दर्शवला. मात्र, शिवसेना आणि काँग्रेसचा विरोध असतानाही महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी हा विरोध लेखी नोंदवून घेत हा प्रस्ताव मंजूर केला.


एल अँड टीला किती छळणार?

एल अँड टी कंपनीसाठी महापालिका आयुक्त वकिली करत असल्याचा आरोप यापूर्वी होत असतानाच शनिवारी झालेल्या बैठकीत आयुक्तांनी पुन्हा या कंपनीची बाजू लावून धरली. ही कंपनी १० हजार नोकऱ्या निर्माण करणार आहे. आम्ही बिल्डरसाठी झाडे कापण्यास परवानगी मागत नाही. तर यातून रोजगार निर्माण होणार आहे, असे सांगत आयुक्तांनी या कंपनीला अजून किती तुम्ही छळणार आहात? असा सवाल सत्ताधारी पक्षाला केला. या एल अँड टीला मुंबईतून घालवण्याचा तुमचा विचार आहे का? असाही सवाल आयुक्तांनी केल्याचे समजते.


शिवसेनेच्या विरोधावर शंका

मेट्रो हा सरकारी प्रकल्प आहे. तो कुण्या खासगी विकासकाचा नाही. त्यामुळे भाजपाच्या दोन सदस्यांनी या झाडांची पाहणी केली, त्यात गैर काय? असा सवाल करत भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी एल अँड टीच्या झाडांची आधी पाहणी करण्याची मागणी करायची. प्रशासनाने ही मागणी मान्य करून पाहणी करायला दिल्यानंतरही पुन्हा याला विरोध करायचा? पण नक्की विरोध का? याचे कारणच ते देत नसल्यामुळे त्यांच्या विरोधावरच शंका उपस्थित होते, असे मनोज कोटक यांनी स्पष्ट केले.



हेही वाचा

पारसी कॉलनीचा हेरिटेज लूक बिघडणार?


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा