माहिममधील नारळी बागेवर ‘मेट्रो’ची वक्रदृष्टी

MAHIM
माहिममधील नारळी बागेवर ‘मेट्रो’ची वक्रदृष्टी
माहिममधील नारळी बागेवर ‘मेट्रो’ची वक्रदृष्टी
माहिममधील नारळी बागेवर ‘मेट्रो’ची वक्रदृष्टी
See all
मुंबई  -  

मुंबई मेट्रो-३ या प्रकल्पासाठी आणखी १३ भूखंडांची मागणी एमएमआरडीने केली असून यामध्ये माहिममधील नारळीबाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देसाई मैदानाच्या जागेवरही आता मेट्रोची वक्रदृष्टी पडली आहे. मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी या मैदानाची जागा तात्पुरत्या वापरासाठी एमएमआरडीएने मागितली आहे. परंतु, तात्पुरत्या वापरासाठी या मैदानाची जागा जाणार असल्यामुळे आता मैदानावरील खेळही बंद होणार आहेत. त्यामुळे आता याविरोधात सूर उमटू लागले आहेत.


आणखी १३ मोकळ्या भूखंडांची मागणी

‘मुंबई मेट्रो ३’ अर्थात कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मेट्रो प्रकल्पांसाठी खेळाची आठ मैदाने आणि उद्यानांसह महापालिकेचे १७ भूखंड ३० वर्षांच्या भाडेकरारावर देण्याचा प्रस्ताव यापूर्वी महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने काँग्रेस, सपा, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच मनसेच्या मदतीने फेटाळून लावल्यानंतर सरकारने अध्यादेश जारी करत हे भूखंड आपल्या अधिकारात घेतले. परंतु, आता पुन्हा एकदा मेट्रो ३ साठी आणखी १३ भूखंडांची मागणी केली असून त्यामध्ये ४ भूखंड हे कायमस्वरुपी देण्याची मागणी सरकारने महापालिकेकडे केली आहे. हा प्रस्ताव सुधार समितीने राखून ठेवला आहे.

माहिममधील एकमेव खेळाचे मैदान

मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी यापूर्वी मोकळ्या जागांवर वाद उठलेला असतानाच आता नव्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. माहिममधील देसाई मैदाने हे या भागातील एकमेव खेळाचे मैदान असून या मैदानात क्रिकेटसह खो खो आणि कबड्डी आदी खेळ खेळले जातात. परंतु हे मैदान मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी एमएमआरडीएच्या ताब्यात जाणार असेल, तर मुलांचे एकमेव अखेळाचे मैदान हातचे जाणार आहे. माहिम पश्चिम भागातील मुलांना यापुढे या मैदानात खेळता येणार नाही.


मैदानाच्या विकासावर कोट्यवधी खर्च

देसाई मैदान हे या भागातील नागरिकांना नारळी बाग म्हणून परिचित आहे. या मैदानाचा विकास काही महिन्यांपूर्वीच करण्यात आला असून यामध्ये ओपन जिमपासून लहान मुलांची खेळणीही स्थानिक मनसेचे नगरसेवक विरेंद्र तांडेल यांनी नगरसेवक निधीतून बसवली आहे. मैदानाच्या आतील बाजूस सकाळ-संध्याकाळ फिरणाऱ्या लोकांसाठी जॉगिंग ट्रॅक बनवले आहेत. यावर कोट्यवधी रुपये खर्च केले गेले आहेत. तसेच, आमदारांच्या विकास निधीतूनही याच्या प्रवेशद्वाराचा विकास करण्यात आला आहे.


मैदान मेट्रोला देण्यास मनसेचा विरोध

मेट्रो प्रकल्पासाठी जर देसाई मैदान बाधित होणार असेल तर आमचा याला तीव्र विरोध असेल, असा इशारा मनसेचे माजी नगरसेवक विरेंद्र तांडेल यांनी दिला आहे. माहिममधील मुलांना क्रिकेटसह मैदानी खेळ खेळण्यास हे एकमेव मैदान आहे. केवळ स्थानिक मुलेच नाही, तर सरस्वती, कनोसा आदी शाळांच्या स्पर्धाही याच मैदानात होतात. अशा स्थितीत आम्ही हे मैदान देणार नाही. स्थानिक रहिवाशांसोबत मनसे राहील, असे तांडेल यांनी सांगितले.


मैदानाच्या शेजारील भूखंडाचा पर्याय

मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या विरोधात आम्ही नाही. प्रकल्प हा व्हायलाच पाहिजे. परंतु आमचे मैदान घेऊन भावी पिढीच्या खेळण्याच्या उमेदीला चाप लावून जर असा प्रकल्प राबवला जात असेल तर आमचा विरोध राहील, असे स्पष्ट करत विरेंद्र तांडेल यांनी मैदानाऐवजी दुसऱ्या भूखंडाचा विचार करावा, अशी सूचना केली आहे. या मैदानाशेजारीच एक मोकळा भूखंड असून तो वापरात नाही. त्यामुळे मेट्रोने तो भूखंड घेऊन देसाई मैदानाच्या जागेचा विचारा सोडावा, असाही पर्याय त्यांनी सुचवला आहे.हेही वाचा:

मेट्रो रेल्वेवरून शिवसेना-भाजपा एकमेकांवर घसरले


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.