Advertisement

जे.जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा आराखडा अंतिम टप्प्यात


जे.जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा आराखडा अंतिम टप्प्यात
SHARES

गेल्या दीड शतकाहून अधिक काळ लाखो रुग्णांसाठी जीवनदायी ठरलेल्या आणि उत्तम डॉक्टर घडविणाऱ्या शासनाच्या भायखळा येथील जे.जे. रुग्णालयाचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुपांतर करण्यास शासनाची मंजुरी मिळाली आहे. मात्र अद्याप आवश्यक त्या परवानग्या मिळण्यास विलंब होत असल्याने हा प्रकल्प रखडल्याचे अामदार नरेंद्र पाटील यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. प्रत्युत्तरादाखल, या प्रस्तावावर कार्यवाही सुरू असून लवकरच बांधकाम सुरू होईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.


गरीबांना उपचार मिळण्यात अडचणी

तब्बल ८८१ कोटी रुपये खर्चून जे.जे.चे रुपांतर हायटेक मल्टी सुपरस्पेशालिटी रुग्णालयात होणार आहे. याचा फायदा हजारो गोरगरीब रुग्णांना वैद्यकीय सेवेच्या रुपात होणार आहे. मात्र या प्रकल्पाला होत असलेल्या विलंबामुळे गरिब रुग्णांना उपचार मिळण्यात अडचणी येत असल्याचे सांगितले. रुग्णालयाच्या बांधकामाच्या डीपी प्लॅनमध्ये काही सुधारणा असून त्या मान्य झाल्या की लगेच निविदा काढून बांधकाम सुरू करण्यात येईल, असं उत्तर गिरीश महाजन यांनी दिलं. हा प्रकल्प आणि त्याचं बांधकाम मोठं असल्यानं बांधकामाची ठराविक कालमर्यादा सांगू शकत नसल्याचंही त्यांनी सांगितलं.


स्वच्छतेवरही लक्ष देणार

मुंबईतील इतर शासकीय रुग्णालयांपेक्षा जे जे रुग्णालयातील सुविधा चांगल्या असतात, मात्र तेथील स्वच्छतेच्या सुविधांसाठी खासगी सेवा उपलब्ध करण्यात येतील का, असा प्रश्न जयंत पाटील यांनी विचारला असता, यावर सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या दृष्टीने आवश्यक त्या स्वच्छतेची काळजी शासनामार्फत घेण्यात येईल, असं उत्तरही गिरीश महाजन यांनी दिलं.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा