
महानगर गॅसने Mahanagar Gas Limited (MGL) मुंबईसह संपूर्ण एमएमआर परिसरात सीएनजीच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ जाहीर केली आहे. 14 मेपासून लागू झालेल्या नव्या दरानुसार सीएनजीचा दर 82 रुपयांवरून 84 रुपये प्रति किलो झाला आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशातील वाहनचालकांना या दरवाढीचा मोठा फटका बसणार आहे. जागतिक पातळीवरील तणाव, मध्य पूर्वेतील ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम, आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन यामुळे ही दरवाढ करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
तसेच देशांतर्गत नैसर्गिक वायूचा मर्यादित पुरवठा आणि आयातीत गॅसचा वाढलेला खर्चही यामागील कारण असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या दरवाढीचा सर्वाधिक परिणाम ऑटो-रिक्शा आणि टॅक्सी चालकांवर होणार आहे. एमएमआर परिसरात सुमारे 12.8 लाख वाहने सीएनजीवर चालतात. त्यामध्ये अंदाजे 4.7 लाख ऑटो-रिक्शा, 1.6 लाख टॅक्सी आणि 5 लाखांहून अधिक खासगी कारांचा समावेश आहे.
सीएनजी दरवाढीनंतर ऑटो आणि टॅक्सी संघटनांकडून भाडेवाढीची मागणी होण्याची शक्यता आहे. संघटनांच्या मते, ऑटो चालविण्याचा खर्च प्रति किलोमीटर सुमारे 1.03 रुपयांनी वाढणार असून किमान भाड्यात किमान 1 रुपयांची वाढ करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
दरम्यान, वाढत्या इंधन दरांमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीतही लवकरच वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मुंबईकरांवरील महागाईचा आणखी ताण वाढण्याची चिन्हे आहेत.
हेही वाचा
