Advertisement

'ते' रोखणार मुंबई, ठाण्याचं दूध!

फुकट दूध वाटप आंदोलन ९ मे पर्यंत सुरू राहणार असून तोपर्यंत या आंदोलनाची दखल सरकारने घेतली नाही, अध्यादेशाची अंमलबजावणी सुरू केली नाही. तर मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यातील सर्व मोठ्या शहरांचा दूध पुरवठा बंद करण्यात येईल, असं नवले यांनी स्पष्ट केलं.

'ते' रोखणार मुंबई, ठाण्याचं दूध!
SHARES

दूधाला प्रतिलीटर २७ रुपये देण्याच्या राज्य सरकारच्या अध्यादेशाची त्वरीत अंमलबजावणी करा, नाहीतर ठाणे-मुंबईसह इतर शहरांचा दूधपुरवठा बंद करू, असा संतप्त इशारा दूध उत्पादक संघर्ष समितीचे डाॅ. अजित नवले यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिला.


फुकट दूध वाटणार

शेतकऱ्यांचा इशारा सरकारला कळावा यासाठी संतप्त दूध उत्पादक शेतकरी गुरूवार ३ मे ते ९ मे दरम्यान राज्यभर फुकट दूध वाटप आंदोलन सुरू केलं आहे. दूध उत्पादक जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन होणार असून ९ मेपर्यंत २७ रुपये भाव न मिळाल्यास त्यापुढचं पाऊल उचलण्यात येईल, असंही नवले म्हणाले.



शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान

राज्याच्या कानाकोपऱ्यात जो काही दूध पुरवठा होतो, त्यातील सव्वा कोटी लिटर दूध पुरवठा हा ग्रामीण महाराष्ट्रातून होतो. असं असताना दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे. दूधाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरल्यानंतर राज्य सरकारनं दूधाला २७ रुपये भाव दिला. त्यासंबंधीचा अध्यादेशही निघाला. पण प्रत्यक्षात अद्यापही अध्यादेशाची अंमलबजावणी होत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.


प्रति लिटर १७ रुपये फक्त

नवले यांनी दिलेल्या माहितीनुसार दूधाला २७ रुपये भाव असतानाही राज्यभरातील दूध उत्पादकांना १७ रुपये भाव दिला जातो. त्यामुळे प्रति लिटरमागे शेतकऱ्यांचं १० रुपयांनी नुकसान होत आहे. हे नुकसान शेतकऱ्यांनी का सहन करायंच? असा सवाल दूध उत्पादक संघर्ष समितीने केला आहे.



राज्यभर आंदोलनाची हाक

जर नुकसानच सहन करायच असेल तर दूध फुकटच देऊ, असं म्हणत संघर्ष समितीने फुकट दूध वाटप आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाला गुरूवारपासून राज्यभर सुरूवात होणार आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालय, भाजपाचे आमदार-खासदार, नगरसेवक यांच्यासह येईल त्याला फुकट दूध दिलं जाणार आहे.


तर, दूध टंचाईला सामोरं जा

फुकट दूध वाटप आंदोलन ९ मे पर्यंत सुरू राहणार असून तोपर्यंत या आंदोलनाची दखल सरकारने घेतली नाही, अध्यादेशाची अंमलबजावणी सुरू केली नाही. तर मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यातील सर्व मोठ्या शहरांचा दूध पुरवठा बंद करण्यात येईल, असं नवले यांनी स्पष्ट केलं. जर हा दुध पुरवठा बंद झाला तर मुंबईकरांना दूध टंचाईला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. या दूध टंचाईमुळं ग्राहकांना चढ्या दरानं दूध खरेदी करावं लागण्याचीही शक्यता आहे.



हेही वाचा-

होऊन जाऊदे, ठंडा ठंडा कुल कुल!

'इथं' घ्या ४०० प्रकारच्या डिजर्टचा आस्वाद!



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा