SHARE

अनेक सामान्य आणि गरजू रुग्णांना मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये अत्यल्प दरात चांगली वैद्यकीय सेवा दिली जाते. याच रुग्णालयांमध्ये 'शीव' परिसरातील लोकमान्य टिळक महापालिका सर्वोपचार रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाचाही समावेश होतो. या रुग्णालयामध्ये येणाऱ्या रुग्णांवर आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णालयातील विविध विभागांमध्ये असणाऱ्या शस्त्रक्रिया कक्षांपैकी मूत्रशल्यचिकित्सा विभागातील २ शस्त्रक्रिया कक्ष आता अत्याधुनिक अशा 'मॉड्युलर ऑपरेशन थिएटर' मध्ये रुपांतरित करण्यात आले आहेत.

महापालिकेच्या अर्थसंकल्पीय अंदाजात प्रस्तावित करण्यात आल्यानुसार लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयातील २ शस्त्रक्रिया कक्ष हे आता जर्मन तंत्रज्ञान आधारित अत्याधुनिक अशा 'मॉड्युलर ऑपरेशन थिएटर' मध्ये रुपांतरित करण्यात आले आहेत.


दोन शस्त्रक्रिया एकाचवेळी

मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करताना मूत्रपिंड देणाऱ्या आणि घेणाऱ्या अशा दोन्ही व्यक्तींवर एकाचवेळी शस्त्रक्रिया करणे गरजेचं असल्याने मूत्रशल्यचिकित्सा विभागातील २ शस्त्रक्रिया कक्ष एकाच वेळी 'मॉड्युलर ऑपरेशन थिएटर' मध्ये रुपांतरित करण्यात आले आहेत. मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आणि मूत्रशल्यचिकित्सा विभागातील इतर जटिल शस्त्रक्रियांसाठी या 'माड्युलर ऑपरेशन थिएटर'चा प्राधान्याने उपयोग करण्यात येणार असून यात दिवसाला साधारणपणे १० शस्त्रक्रिया करता येतील.


यांची उपस्थिती

महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या उपस्थितीत हे 'मॉड्युलर ऑपरेशन थिएटर' नुकतेच कार्यान्वित करण्यात आलं. याप्रसंगी वैद्यकीय शिक्षण आणि प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. अविनाश सुपे, लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. जयश्री मोंडकर, मूत्रशल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. अजित सावंत, महापालिकेचे उपायुक्त (आयुक्त कार्यालय) रमेश पवार यांच्यासह रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर मंडळी, संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.


जंतुसंसर्गाची शक्यता कमी

या शस्त्रक्रिया कक्षांमध्ये प्रामुख्याने मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात येणार आहे. प्रत्यारोपणासारख्या तुलनेने आव्हानात्मक शस्त्रक्रियांसाठी 'मॉड्युलर ऑपरेशन थिएटर' हे शास्त्रीयदृष्ट्या अधिक चांगले मानले जातात. यात शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाला जंतुसंसर्गाची शक्यता तुलनेने कमी असते, अशी माहिती महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयाचे संचालक डॉ. अविनाश सुपे यांनी दिली आहे.


या दोन्ही शस्त्रक्रिया कक्षांमध्ये असणाऱ्या 'ऑपरेशन टेबल'च्या वर छायाचित्रण कॅमेरे बसवण्यात आले असून ते ऑपरेशन थिएटरच्या बाहेर असणाऱ्या दूरचित्रवाणी संचाला (टीव्ही) जोडण्यात आलेले आहेत. ज्यामुळे प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना मार्गदर्शन मिळू शकणार आहे.


हेही वाचा - 

शीव रुग्णालयातील व्हेंटिलेटर्स घेताहेत अखेरचा 'श्वास'

महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये लवकरच अल्ट्रासाऊंड कलर डॉपलर मशीन

संबंधित विषय
ताज्या बातम्या