Advertisement

झाडांनीही केली वाहतूक कोंडी


झाडांनीही केली वाहतूक कोंडी
SHARES

मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी तुंबल्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झालेली असतानाच ठिकठिकाणी झाडे पडल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. आधीच पाण्यामुळे निर्माण झालेल्या वाहतूककोंडीचा सामना कराव्या लागणाऱ्या वाहन चालकांकडून अन्य पर्यायी मार्गाचा वापर केला जात होता. परंतु, अनेक भागांमध्ये पडलेल्या झाडांमुळे हे वाहनचालक वाहतूक कोंडीत अडकले जात होते. त्यामुळे मुंबईतील प्रमुख रस्त्यांसह गल्लीबोळातही वाहतुकीची कोंडी पहायला मिळत होती.

मुंबईतील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसामुळे झाडे उन्मळून पडण्याची तसेच फांद्या तुटून पडण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडले आहेत. माटुंगा पश्चिम येथील जे. के. सावंत मार्ग या एकाच रस्त्यावर एकाच वेळी तीन झाडे पडण्याचे प्रकार घडले आहेत. यातील एक झाड वाहनावर पडून वाहनांचे मोठे नुकसार न झाले आहे. हे झाड मुळापासून उन्मळून पडून ही दुघर्टना घडली. याच मार्गावर महालक्ष्मी हॉल येथील तसेच देवकीवाडी शेजारील झाडही उन्मळून पडून एका दुधाच्या आरे स्टॉल्सवर कोसळले. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी स्टॉल्सचे नुकसान झाले आहे.

माटुंगा पश्चिम शेजारी सेनापती बापट मार्गावर पाणी तुंबल्यामुळे रुपारेल कॉलेजकरून बालगोविंददास रोडवरून जे. के.सावंत मार्गावरून जाण्यासाठी येणाऱ्या वाहन चालकांना या झाडांमुळे अडकून पडावे लागले. त्यामुळे या जे. के. सावंत मार्गावर मोठ्याप्रमाणात वाहनांची कोंडी निर्माण झाली होती. संध्याकाळी या मार्गावरील वाहन कोंडीमुळे रुग्णवाहिकांना पुढे सरकता येत नव्हते. रुग्ण्वाहिकांचे सायरन तसेच गाड्यांचे हॉर्न यामुळे या अनेक भागांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते.

याशिवाय माटुंगा पश्चिम येथे बस स्थानकावरच झाड कोसळून बस स्थानकाचे नुकसान झाले आहे, तर दादर भवानी शंकर रोड येथे झाड उन्मळून पडल्यामुळे भवानी शंकर रोडवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. वरळीत एका टेम्पोवर झाड पडल्यामुळे वाहनांचे नुकसान झाले होते. मुंबईतील दादर, माटुंगा, वरळी, लोअरपरळ,एलफिन्स्टन रोड, खार, वांद्रेसह घाटकोपर, शीव, आदी भागांमध्ये मोठ्याप्रमाणात पाणी तुंबले होते.


हेही वाचा - 

मुंबई तुंबली - रेल्वे ठप्प, रस्ते जाम !

बोरिवली-माटुंगा प्रवास 130 मिनिटांचा


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा