मुंबईकरांना गायींचा त्रास, कारवाई करण्याची नगरसेवकांची मागणी!

BMC
मुंबईकरांना गायींचा त्रास, कारवाई करण्याची नगरसेवकांची मागणी!
मुंबईकरांना गायींचा त्रास, कारवाई करण्याची नगरसेवकांची मागणी!
See all
मुंबई  -  

देशात सध्या गोहत्या आणि गो रक्षणावरून वातावरण तापलेले असतानाच मुंबईतील भटक्या आणि रस्त्यांवर गायी घेऊन बसणाऱ्या महिलांवरून महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या गायींमुळे लोकांना चालायला जागा मिळत नसून यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी निर्माण होते. तसेच या गायींचं शेण व चारा रस्त्यांवर पडून अस्वच्छता होत असल्यामुळे या गायींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थायी समिती सदस्यांनी केली.


सात महिन्यांपासून कामगार बसून

मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील रहदारीस अडथळा निर्माण करणारी बेवारस व भटकी जनावरे पकडून कोंडवाड्यात आणण्यासाठी  ४ कॅटल इम्पाऊंडिंग वाहनांचा पुरवठा करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीला आला होता. यावेळी शिवसेनेचे मंगेश सातमकर यांनी या विभागाचे कर्मचारी सात महिन्यांपासून बसून असल्याची बाब निदर्शनास आणली. मग याबाबत कोणत्या विभागावर कारवाई करायची? असे सांगत भटक्या गायी, म्हशींवर कारवाई केली जात नसल्याचे सांगितले. मोकळ्या पदपथांवरही ही भटकी जनावरे असतात. त्यामुळे 'भटकी' हा शब्द काढून 'रस्त्यांवरील रहदारीस अडथळा आणणारी सर्व जनावरे' असा शब्दप्रयोग करण्यात यावा, अशी मागणी भाजपाचे अॅड. मकरंद नार्वेकर यांनी केली.


पूर्व उपनगरात गोशाळा बांधा

गोमाता ही वंदनीय असली तरी माझ्या विभागात १५ ठिकाणी गायींना घेऊन महिला बसत असतात. त्यामुळे पदपथ अडवून त्याठिकाणी स्वच्छता करत असतात. त्यामुळे पूर्व उपनगरात गोशाळा बांधून या सर्व गायींचे रक्षण केले जावे, अशी मागणी शिवसेना नगरसेविका समिक्षा सक्रे यांनी केली. चारकोपमध्येही तब्बल १२ ठिकाणी अशा महिला गायी पदपथावर घेऊन बसत असल्याचे शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुडेकर यांनी सांगितले. या महिलांना गाय आणि चारा मालक पुरवतो. परंतु यामुळे अस्वच्छता वाढत असून दोन महिन्यांपूर्वी एका मुलाला गायीने शिंगाने उडवल्याचेही त्यांनी सांगितले.


समाजावादी पक्षाला हवी गोशाळा

मानखुर्द, शिवाजीनगर परिसरात भटक्या गायींची मोठी समस्या असून या गायींसाठी मानखुर्दमध्ये गोशाळा बांधली जावी, अशी मागणी सपाचे गटनेते रईस शेख यांनी केली. देवनार डंपिंग ग्राऊंडच्या परिसरात मोठ्या प्रमाणात चारा असल्यामुळे त्याठिकाणी गायींना चरायला सोडले जात होते. हा चारा खाऊन झाला, की त्या गायी पुन्हा निघून जातात, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, या गायींच्या समस्यांची दखल प्रशासनाकडून घेतली जात असून कॅटल इम्पाऊंडिंग या गाड्या घेण्यात आल्यानंतर त्वरीत या भटक्या गायींवर कारवाई केली जाईल, असे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी स्पष्ट केले आहे.हेही वाचा

गोशाळा मुंबईत नकोच - शिवसेनेचा विरोध


Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.