गोशाळा मुंबईत नकोच - शिवसेनेचा विरोध

  BMC
  गोशाळा मुंबईत नकोच - शिवसेनेचा विरोध
  मुंबई  -  

  सध्या गोरक्षांवरून देशात वातावरण चांगलेच तापलेले असताना शिवसेनेने मुंबईत गोशाळेची गरजच नसल्याचे जाहीर केले. मुंबईत गोशाळेसाठी भूखंड राखीव ठेवण्याची मागणी भाजपाने केली आहे. परंतु, मुंबईत अशा प्रकारच्या गोशाळांची गरजच नसून मुंबईबाहेर गोशाळा बनवल्या जाव्यात, अशी सूचनाच शिवसेनेने केली आहे.


  विकास आराखड्यात गोशाळा नाहीच!

  मुंबई शहर व उपनगरात गोशाळा निर्माण करण्यासाठी १० हजार चौरस मीटरचे भूखंड नवीन विकास आराखड्यात राखून ठेवण्याची मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक डॉ. राम बारोट यांनी केली होती. त्यावर प्रशासनाने प्रारुप विकास आराखड्यात ६८७६.१६ हेक्टर क्षेत्रफळ एवढी जागा कोंडवाड्यासाठी राखीव करण्यात आल्याचे सांगितले होते. परंतु, हा प्रस्ताव पुन्हा सुधार समितीत आल्यानंतर कोंडवाड्याची संकल्पना वेगळी असून, सध्या शहरातील तबेले काढून टाकण्यात आलेले आहे. त्यामुळे राष्ट्रीय संपत्ती असलेल्या प्राणीमात्रांचे संगोपन करण्याबाबत प्रशासन काय कार्यवाही करणार आहे? अशी विचारणा करत हा प्रस्ताव फेरविचारासाठी परत प्रशासनाकडे पाठवला होता.


  ...तर आरे कॉलनीत बनवा

  मे २०१६मध्ये पुनर्प्रसिद्ध झालेल्या 'प्रारुप विकास आराखडा २०३४'मध्ये गोशाळेच्या उद्दिष्टाकरता कोणतेही आरक्षण ठेवण्यात आले नसल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. तसेच, नियोजन समितीनेही याबाबत कोणतीही शिफारस केलेली नाही, असे अभिप्राय दिले. त्यामुळे हा प्रस्ताव पुन्हा सुधार समितीपुढे आला असता भाजपाचे नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी केंद्र सरकार गायींना महत्व देत असताना आपणही गोशाळेचा विचार करायला हवा, त्यामुळे लोकवस्तीत जर हे आरक्षण टाकता येणार नसेल, तर आरे कॉलनीत यासाठी आरक्षण टाकले जावे, अशी मागणी गंगाधरे यांनी केली.


  मुंबई बाहेर बनवा गोशाळा

  काँग्रेसचे नगरसेवक विठ्ठल लोकरे यांनीही गोशाळेची गरज असल्याचे सांगत भाजपाच्या मागणीला पाठिंबा दिला. शिवसेनेचे रमाकांत रहाटे यांनी गोशाळेला आपला विरोध असल्याचे सांगत मुंबईत तबेले नसावेत, असा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईत गोशाळा नकोच, असे त्यांनी सांगितले. माजी महापौर विशाखा राऊत यांनी गोशाळेला विरोध नाही, तर मुंबईबाहेर गोशाळा बनवली जावी, अशी आमची मागणी असल्याचे स्पष्ट केले.


  शेणामुळे नाले, नद्या तुंबतात!

  जर तबेले मुंबईबाहेर शिफ्ट केले गेले, तर गोशाळा मुंबईत कशा निर्माण केल्या जाऊ शकतात? असा सवाल करत गोशाळा मुंबई बाहेरच बनवल्या जाव्यात, अशी मागणी माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी केली. मुंबईत तबेले नसावेत हे सरकारचे आदेश आहेत, याची आठवण करून देत जाधव यांनी गाई, म्हशींचं शेण नाले व नदीत टाकले जात असल्यामुळे पाण्याचा प्रवाह रोखला जाऊन पाणी तुंबण्याचे प्रकार घडत असल्याचे सांगितले.


  दोन वेळा प्रस्ताव आणूनही...

  गोशाळेबाबत आजवर दोन वेळा सुधार समितीत प्रस्ताव आला आहे. प्रशासनाने याबाबत आपली भूमिका स्पष्ट करत गोशाळेसाठी कोणतेही आरक्षण नसल्याचे सांगितले. त्यामुळे खुद्द प्रशासनच गोशाळा नसावी, या विचाराचे असल्यामुळे शिवसेनेनेही तीच भूमिका घेतली आहे. जर भाजपाला गोशाळा हवी असल्यास त्यांनी सरकारला सांगून विकास आराखड्यात तसे आरक्षण टाकून घ्यावे. परंतु, तबेले असोत वा गोशाळा या मुंबईत नसाव्यात, हा सरकारचा निर्णय असल्यामुळे त्यांनी तबेले मुंबईबाहेर हलविण्याचा प्रयत्न केला असल्याचे सुधार समिती अध्यक्ष बाळा नर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे हा प्रस्ताव निकालात काढला असल्याचे त्यांनी सांगितले.  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.