Advertisement

भांडुपमधील सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची जागा तुर्तास वाचली! प्रस्ताव फेरविचारासाठी पाठवला


 भांडुपमधील सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची जागा तुर्तास वाचली! प्रस्ताव फेरविचारासाठी पाठवला
SHARES

भांडुपमध्ये मुंबई महापालिकेच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या आड येणाऱ्या विकासकाला सुधार समितीने जोरदार धक्का दिला. विकासकाला 8 हजार चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा परत करण्याच्या प्रशासनाच्या निर्णयालाच आव्हान देत सुधार समितीने याप्रकरणी पुन्हा न्यायालयात दाद मागण्याची मागणी करत हा प्रस्ताव फेरविचारासाठी परत पाठवला. याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी सुधार समितीने केली आहे. त्यामुळे भांडुपमधील रुग्णालयाचे स्वप्न साकार होण्याची चिन्हे आहेत.


भूखंडाचा पूर्वेइतिहास

भांडुप पश्चिम नाहुर गावमधील नगर भू क्रमांक 681/अ/8ब या भूखंडावर विकासक रुणवाल होम्स यांनी विकास हस्तांतरीत हक्क (टीडीआर) देण्याच्या बदल्यात 18,765.30 चौरस मीटर क्षेत्रफळाचा रुग्णालयासाठी आरक्षित असलेला सुविधा भूखंड महापालिकेच्या ताब्यात दिला होता. परंतु येथील रस्त्यांची जागा सोडण्यावरून वादंग निर्माण झाल्यानंतर विकासक रुणवाल होम्स यांनी महापालिकेविरोधात न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर 21 ऑक्टोबर 2015 मध्ये 8209.30 चौ.मी क्षेत्रफळाची जागा विकासकाला परत करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. याविरोधात सर्वौच्च न्यायालयात दाद मागितल्यानंतर न्यायालयानेही उच्च न्यायालयात फेर याचिका करण्याचे आदेश दिले. परंतु न्यायालयात योग्य प्रकारे बाजू न मांडणाऱ्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशाचे दाखले देत 8209.30 चौ.मी.ची जागा परत विकासकाला देण्याचा निर्णय घेतला आहे. या बाबतचा प्रस्ताव मागील सुधार समितीत राखून ठेवण्यात आला होता.


प्रस्ताव रेकॉर्ड करण्याची भाजपाची मागणी

गुरुवारी हा प्रस्ताव पुन्हा पटलावर आला असता सुधार समितीचे माजी अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांनी हा भूखंड विकासकाला देण्यास विरोध असून याठिकाणी रुग्णालयच व्हावे अशी मागणी करत हा प्रस्ताव रेकॉर्ड करावा अशी मागणी केली. याठिकाणी 2 भूखंड आहेत. त्यांच्या प्रॉपटी कार्डवर महापालिकेचे नाव चढवण्यात आला नसल्याचे सांगत गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांसाठी या रुग्णालयाची गरज असल्याचे सांगितले.


याप्रकरणी चौकशी व्हावी

हा भूखंड ताब्यात घेण्याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कर्तव्याचे पालन केले नसल्याचा आरोप करत कॉंग्रेसचे नगरसेवक अश्रफ आझमी यांनी याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली. त्यामुळे हा प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.रुग्णालयाची गरज असून जर ही जागाच देण्याची वेळ आली तर आजुबाजूची जागा द्यावी किंवा टीडीआर एफएसआयचा लाभ दिला जावा. पण कोणत्याही परिस्थिती रुग्णालय व्हायलाच हवे, अशी मागणी माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी केली. शिवसेनेचे रमाकांत रहाटे यांनीही रुग्णालय व्हायलाच पाहिजे, अशी मागणी केली


न्यायालयाच्या आदेशानेच...

चेंज युजर अंतर्गत ही 18,500 चौ मी ची जागा प्राप्त झाली असून रस्त्याच्या जागेबाबत विकासक कोर्टात गेल्यानंतर, न्यायालयाच्या आदेशानेच ही जागा द्यावी लागत आहे. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात जाऊन काहीही उपयोग नसल्याचे उपायुक्त चंद्रशेखर चौरे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सुधार समिती अध्यक्ष बाळा नर यांनी याठिकाणी रुग्णालय होणे आवश्यक आहे. त्यामुळे यावर विधी खात्यांचे अभिप्राय घेऊन आणावा असे सांगत सर्वपक्षीय सदस्यांच्या मागणीनुसार हा प्रस्ताव फेरविचारासाठी प्रशासनाकडे परतवून लावला.


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा