Advertisement

चार वाजल्यानंतर चालू असलेली २ दुकानं सील, ५ रेस्टॉरंट बारला दंड

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जारी करण्यात आलेल्या स्तर ३ मधील प्रतिबंधात्मक नियमावलीनुसार दुकाने आणि आस्थापना सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी आहे

चार वाजल्यानंतर चालू असलेली २ दुकानं सील, ५ रेस्टॉरंट बारला दंड
SHARES

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात काटेकोर अंमलबजावणी करून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकडे विशेष दक्षता पथकांच्या माध्यमातून बारकाईने लक्ष दिले जात आहे. पालिका क्षेत्रात ३१ विशेष दक्षता पथकांनी विशेष कारवाई करीत कोरोना नियमांच्या उल्लंघन करणाऱ्यांकडून मागील एका महिन्यात ३७३३ व्यक्ती आणि दुकानदार यांच्याकडून १६ लाख ७७ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जारी करण्यात आलेल्या स्तर ३ मधील प्रतिबंधात्मक नियमावलीनुसार दुकाने आणि आस्थापना सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी आहे. मात्र त्यानंतरही दुकाने आणि आस्थापना सुरु ठेवणाऱ्यांविरोधात धडक कारवाई कऱण्यात येत आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात सोमवार ते शुक्रवार या दिवशी दुकाने आणि आस्थापना ४ वाजल्यानंतर सुरु असल्यास पहिल्या वेळेस १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल तसंच रेस्टॉरंट, बार, पब ४ वाजल्यानंतर सुरु असल्यास ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे नियमांचे दुसऱ्या वेळेस उल्लंघन झाल्यास सदर आस्थापना ७ दिवसांकरिता बंद ठेवण्याची कारवाई करण्यात येईल. तिसऱ्या वेळेस नियमांचे उल्लंघन केल्यास सदर आस्थापना कोरोनाची अधिसूचना संपुष्टात येईपर्यत बंद ठेवण्याची कारवाई करण्यात येईल असं स्पष्टपणे नमूद आहे.

या नियमांचे पालन होत असल्याबाबत विशेष दक्षता पथकांमार्फत बारकाईने लक्ष देण्यात येत असून पहिल्या वेळेस १० हजार रुपये दंड भरूनही पुन्हा दुस-यांदा जाहीर वेळेनंतरही दुकान सुरु ठेवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सेक्टर ६ ऐरोली येथील गुरुकृप जनरल स्टोअर्स व यश सुपरमार्केट या २ दुकानांवर सीलबंद करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

 त्याचप्रमाणे तुर्भे जनता मार्केट येथे रात्री सुरु असणाऱ्या रमेश रेस्टॉरंट व बार आणि द किंग बार या दोन आस्थापनांकडून प्रत्येकी ५० हजार रुपये दंड वसूल कऱण्यात आला आहे. याशिवाय बेलापूर विभागातील विशेष दक्षता पथकांनी सेक्टर १५ येथील स्टार सिटी बार, आरूष रेस्टॉरंट व बार आणि सेक्टर ११ येथील मेघराज रेस्टॉरंट व बार या 3 आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करत प्रत्येकी ५० हजारांचा दंड आकारला  आहे.



हेही वाचा - 

मुंबईकरांवर पाणीकपातीचं संकट ओढवण्याची शक्यता

इंधन दरवाढ सुरूच, पेट्रोल- डिझेल महागलं

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा