ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा १२५ टक्के अधिक पाऊस


SHARE

मुंबईसह राज्यभरात यंदा ऑक्टोबरमध्ये सरासरीपेक्षा १२५ टक्के अधिक पाऊस झाला आहे. बदलत्या हवामानामुळं जुन ते सप्टेंबर असा पावसाचा मोसम संपल्यानंतर देखील १ ते ३० ऑक्टोबर पर्यंत राज्यात पाऊस पडला. हवामान विभाग १ जून ते ३० सप्टेंबर या काळातील पावसाची आकडेवारी ही मोसमातील नोंदी म्हणून गृहीत धरतं. मात्र त्यानंतरही ऑक्टोबरमध्ये जोरदार पाऊस झाला.

परतीचा प्रवास

पावसाचा परतीचा प्रवास लांबल्यामुळं ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मराठवाड्यात पावसानं हजेरी लावली होती.  नंतरच्या काळात अरबी समुद्रात तयार झालेलं महा चक्रीवादळ (कयार) यामुळं परतीच्या काळात अनेक ठिकाणी पावसाच्या नोंदी झाल्या. ऑक्टोबर महिन्यात मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा २०० टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद झाली. बदललेल्या हवामानामुळं देशातील १० राज्यांमध्ये १ ते ३० ऑक्टोबर या काळात सरासरीपेक्षा खूप जास्त(६० टक्क्यांपेक्षा अधिक) पावसाची नोंद झाली.

मध्यम स्वरूपाचा पाऊस

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे आणि मेघगर्जनेसह विजा चमकून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तर पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, नंदुरबार जळगाव, नाशिक, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोल, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत गडगडाटासह पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. पावसाच्या दीर्घकालीन पूर्वानुमानानुसार राज्यात ७ नोव्हेंबपर्यंत अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तविली आहे.हेही वाचा -

व्यावसायिक राज कुंद्राची ईडीकडून 9 तास चौकशी

शिवसेना नगरसेविका शितल म्हाञे आणि प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदींना धमकीसंबंधित विषय
ताज्या बातम्या