Advertisement

महापालिकेतच सभागृह नेत्यांचा खिसा कापला, मोबाईल पळवला


महापालिकेतच सभागृह नेत्यांचा खिसा कापला, मोबाईल पळवला
SHARES

मुंबई - मुंबई महापालिकेचे सभागृहनेते यशवंत जाधव यांना पहिल्याच दिवशी चोरट्यांनी प्रसाद दिला. महापौरपदाच्या निवडणुकीनंतर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे जाताना झालेल्या गोंधळातच चोरट्यांनी जाधव यांचा खिसा साफ करत मोबाईल आणि पाकिटच मारले.

मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर आणि उपमहापौरपदी शिवसेनेच्या उमेदवार हेमांगी वरळीकर यांची निवड बुधवारी झाली. परंतु या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत सभागृहनेते यशवंत जाधव यांचा खिसाच साफ करण्यात आला आहे. 

महापौरपदी विश्वनाथ महाडेश्वर यांची निवड झाल्यानंतर उपमहापौरपदाची निवडणूक सुरु होती. याचवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आदीं महापालिका सभागृहात शुभेच्छा देण्यासाठी आले असता त्यांना आणण्यासाठी यशवंत जाधव गेले होते. त्यावेळी कायकर्ते,पदाधिकारी तसेच प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांच्यामध्ये झालेली धक्काबुक्की आणि गोंधळात जाधव यांचा सॅमसंग एस सिक्स मॉडेलचा मोबाईल फोन आणि पैशांचे पाकीट मारले गेले. मात्र, ही बाब त्यांच्या लक्षात उशिरा आली. त्यामुळे सभागृहनेतेपदाचा भार स्वीकारल्यानंतर काही मिनिटातच जाधव यांना चोरट्यांनी हा प्रसाद दिला. त्यामुळे कोणी याला अपशकून म्हणत आहे, तर कुणी याला साडेसाती संपली असे बोलत आहे.

जाधव यांच्या पाकीटात सुमारे दहा ते बारा हजार रुपयांची रक्कम तसंच यापूर्वी नगरसेवकपदाची ओळखपत्रे आणि पॅनकार्ड, बॅक कार्ड आदी होती. मात्र, मोबाईल आणि पाकीट हे मारले गेले की चोरले गेले याबाबत जाधव मात्र, काहीच बोलत नसून ते कदाचित हरवले गेले असल्याचीही शक्यता जाधव यांच्याकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, आपले मोबाईल आणि पाकीट जर कुणाला सापडले असेल तर कृपया त्यातील नगरसेवकपदाची कार्ड आणि पॅनकार्ड आदी आपल्याला जिथून शक्य असतील तिथून माझ्याकडे पाठवण्याची व्यवस्था करावी, असं आवाहनही जाधव यांनी केले आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा