Advertisement

अर्थसंकल्प आयुक्तांचा नको, नगरसेवकांचा हवा - रवी राजा


अर्थसंकल्प आयुक्तांचा नको, नगरसेवकांचा हवा - रवी राजा
SHARES

मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पावरून विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणातून प्रशासनासोबत सत्ताधारी पक्षांचीही सालटी सोलून काढली. महापालिकेचा अर्थसंकल्पात तरतूद झालेला सर्व निधी खर्च होणे ही प्रशासनाबरोबरच सत्ताधारी पक्षाचीही जबाबदारी आहे, असे सांगत रवी राजा यांनी या सभागृहात अर्थसंकल्पावर बोलून काहीही उपयोग नाही. केवळ औपचारिता म्हणून आपण बोलत आहोत. त्यामुळे यापुढे नगरसेवकांच्या सूचनांची दखल घेऊनच अर्थसंकल्प बनवला जावा, अशी सूचना केली. पुढील अर्थसंकल्प हा आयुक्तांचा नसावा तर नगरसेवकांचा असावा, अशा शब्दात त्यांनी अर्थसंकल्पावर मुद्दे उपस्थित केले.


अर्थहीन अर्थसंकल्प

मुंबई महापालिकेचा सन २०१७-१८चा अर्थसंकल्प महापालिका सभागृहात मांडण्यात आल्यानंतर विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी मंगळवारी आपल्या भाषणातून प्रशासनासोबतच सत्ताधारी शिवसेना, तसेच भाजपावरही सडकून टीका केली. यावर्षीचा अर्थसंकल्प हा १२ हजार कोटींनी कमी झाला. परंतु, मागील वर्षासह त्या आधीचे अर्थसंकल्प हे याच शिवसेना आणि भाजपाने मंजूर केले होते. परंतु यंदा ही रक्कम कमी झाल्यामुळे आतापर्यंत फुगवलेला फुगा फुटला. हा अर्थसंकल्प म्हणजे अर्थहीन अर्थसंकल्प असल्याचे सांगत आयुक्त जे बनवून आणतात, त्याचीच अंमलबजावणी होते, सभागृहात नगरसेवकांनी केलेल्या सूचनांची कधीही दखल घेतली जात नाही, अशा शब्दांत रवी राजा यांनी नाराजी व्यक्त केली.


झोपड्यांच्या मालमत्ता कराला जाहीर विरोध

५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ व ५०० ते ७०० चौरस फुटांच्या घरांना सवलत देण्याचा निर्णय सत्ताधारी शिवसेना आणि भाजपाने घेतला आहे. परंतु याच अर्थसंकल्पात झोपडपट्टयांना मालमत्ता कर लावण्याचे संकेत महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे  झोपड्यांच्या मालमत्ता कराला काँग्रेस पक्षाचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पातून जर हा कर वगळला नाही, तर आपण अर्थसंकल्प मंजूर करू देणार नाही, असा इशाराही रवी राजा यांनी  दिला.


बेस्टच्या तरतुदीशिवाय अर्थसंकल्प मंजूर करू नका

बेस्ट उपक्रम हा तोट्यात चालला असून आजवर या उपक्रमाला अनुदान देण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली बऱ्याच बैठका पार पडल्या. त्यामुळे आता ठोस निर्णय घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात बेस्टसाठी १ हजार कोटींची तरतूद करावी, प्रशासन जर ही रक्कम देत नसेल तर हा अर्थसंकल्प मंजूर करू नये. सत्ताधारी पक्षाने पुढाकार घ्यावा, आम्ही विरोधी पक्षनेते आणि पहारेकरी तुमच्यासोबत आहोत. महापालिका सभागृह ही सर्वोच्च बॉडी असून या ठिकाणी केलेल्या निर्णयाला बदलण्याची ताकद कोणात आहे? त्यामुळे असेल हिंमत तर शिवसेनेने पुढाकार घ्यावा, असे आव्हानही रवी राजा यांनी दिले.


औषध वितरणाची चौकशी व्हावी

आरोग्य विभागासाठी यावर्षी ३३१२ कोटी रुपये खर्च केले जात आहे. परंतु, एवढे पैसे खर्च करूनही रुग्णांना चांगल्या प्रकारे आरोग्य सेवा मिळत नाही. आतापर्यंत एच१एन१ मुळे १५ दिवसांमध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे साथीच्या आजारांमुळे जोपर्यंत रुग्णांचे बळी जात राहतील तोपर्यंत या सभागृहात आपण आवाज उठवत राहू, असे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी ठणकावून सांगितले. मोफत औषधांसाठी करोडो रुपये खर्च केले जात आहेत. तरीही रुग्णालयांमध्ये रुग्णांना मोफत औषधे दिली जात नाहीत. त्यामुळे या औषध खरेदीची, तसेच वितरणाची चौकशी केली जावी अशी मागणी राजा यांनी केली. तसेच केईएम, शीव व नायरच्या धर्तीवर उपनगरातील रुग्णालयांमध्येही एमआरआय सेवा दिली जावी, अशी मागणीही त्यांनी केली.


पाच वर्षानंतर विरोधी पक्षनेत्यांचे उत्तम भाषण

याबरोबरच विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी रस्ते, शिक्षण, बाजार, पर्जन्य जलवाहिनी, मलवाहिनी, पाणी पुरवठा आदी विभागांच्या कारभाराचा समाचार घेत प्रशासनाच्या निव्वळ आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तब्बल दीड तासांहून अधिक तासांच्या या भाषणात राजा यांनी शायरीने सभागृहातील सदस्यांचे मन जिंकले. विशेष म्हणजे, मागील पाच वर्षातील तीन विरोधी पक्षनेत्यांच्या तुलनेत या विरोधी पक्षनेत्याचे भाषण सभागृहातील सर्व सदस्यांनी शांततेत ऐकले. आकडेवारीसोबतच प्रशासकीय कामावरही टीका करत राजा यांनी हल्ला चढवत आपण उत्तम विरोधी पक्षनेते असल्याची चुणूक दाखवून दिली.




हेही वाचा

पाहिजे, रुग्णांच्या हक्कासाठी कायदा!


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा