प्रिय झाडांनो, तुमच्या आत्म्यास शांती लाभो...

Nariman Point
प्रिय झाडांनो, तुमच्या आत्म्यास शांती लाभो...
प्रिय झाडांनो, तुमच्या आत्म्यास शांती लाभो...
प्रिय झाडांनो, तुमच्या आत्म्यास शांती लाभो...
See all
मुंबई  -  

'प्रिय झाडांनो, गेल्या 150-200 वर्षांपासून तुम्ही आमच्या कित्येक पिढ्यांना मायेची सावली दिली, पर्यावरणाचे संतुलन राखले. पण आता आम्हीच विकासाच्या नावावर तुमच्या जिवावर उठलोय, तुमची कत्तल करत सुटलोय. आज आमचा विकास होईल, पण पुढे आमच्या भावी पिढीचे काय? आम्हाला माहीत नाही. पण प्रिय झाडांनो, आता आम्हाला माफ करा... आम्हाला विकासच महत्त्वाचा आहे. तेव्हा तुमच्या आत्म्याला शांती लाभो...' अशा शब्दांत शुक्रवारी मेट्रो-3च्या कामात बळी गेलेल्या हजारो झाडांना पर्यावरणप्रेमींकडून श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.

मेट्रो-3 प्रकल्पात 3 हजारांहून अधिक झाडांची कत्तल होणार आहे. ही कत्तल रोखण्यासाठी मुंबईतील पर्यावरणप्रेमींनी एकत्र येत 'सेव्ह ट्री' मोहीम सुरू केली. झाडे वाचवण्यासाठी न्यायालयासोबतच रस्त्यावरही लढाई लढण्यात आली. पण ही लढाई अयशस्वी ठरली. त्यामुळे आजच्या घडीला मेट्रो-3 साठी झाडांची कत्तल जोरात सुरू आहे. दक्षिण मुंबई तर पूर्णपणे उजाड झाली आहे.

150-200 वर्षांच्या झाडांसोबतच 500 वर्षांच्या झाडांचीही कत्तल होत आहे. या कत्तलीमुळे पर्यावरणप्रेमीच नव्हे, तर सामान्य मुंबईकरही हळहळत आहेत. मुंबईकरांची हीच नाराजी प्रतिकात्मक रुपात नोंदवण्यासाठी 'सेव्ह ट्री' शुक्रवारी झाडांचे अंत्यसंस्कार करून त्यांच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेणार असल्याची माहिती 'सेव्ह ट्री'चे सदस्य झोरू बाथेना यांनी दिली.

शुक्रवारी साडेचार वाजता नरीमन पाॅईंट येथील वाय. बी. चव्हाण सेंटर ते चर्चगेट येथील जे. टाटा रोड अशी झाडांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा निघेल. त्यानंतर जे. टाटा रोड येथे श्रद्धांजलीचा कार्यक्रम होईल, असेही बाथेना यांनी स्पष्ट केले.


हेही वाचा

मेट्रो-३ साठी झाडांची कत्तल सुरु; पर्यावरणवादी पुन्हा आक्रमक

आरेतील 100 हून अधिक झाडांची एमएमआरसीकडून बेकायदा कत्तल

छाटणीच्या नावाखाली झाडांची सर्रास कत्तल


आरेमध्येही वनसंरक्षणासाठी वनदुर्गा पूजेचे आयोजन शनिवारी 3 जून रोजी 'सेव्ह आरे ग्रुप'कडून करण्यात आले आहे. दुपारी साडेचार ते संध्याकाळी 6 च्या दरम्यान वनदुर्गा पूजा आणि हवन होणार असून यावेळी सर्वधर्मीय प्रार्थना करणार असल्याची माहिती वनशक्तीचे स्टॅलिन दयानंद यांनी दिली. आपण ज्याप्रमाणे देवांची पूजा करतो, त्याप्रमाणेच जंगल, वन हे देखील आपले देवच असून त्यांचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे या वनदुर्गा पूजा-हवनचे आयोजन केल्याचेही स्टॅलिन यांनी सांगितले.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.