Advertisement

पर्यटकांसाठी शनिवारपासून उघडणार 'माथेरान'चा दरवाजा

लॉकडाऊनमुळं गेले अनेक महिने माथेरान हे पर्यटकांसाठी बंद होतं. मात्र, आता गेल्या दीड वर्षापासून निर्बंधात असलेल्या मुंबईकरांना माथेरानला जाता येणार आहे.

पर्यटकांसाठी शनिवारपासून उघडणार 'माथेरान'चा दरवाजा
SHARES

राज्यात वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला. मात्र हे कडक निर्बंध लॉकडॉऊन प्रमाणेच आहेत. त्यामुळं अनेक जिल्ह्यांतील पर्यटन स्थळ व बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. यामधील एक महत्वाचं म्हणजे 'माथेरान'. थंडगार वातावरण आणि हिरवागार निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी अनेक मुंबईकर हे माथेरानमध्ये हजेरी लावतात. परंतू, लॉकडाऊनमुळं गेले अनेक महिने माथेरान हे पर्यटकांसाठी बंद होतं. मात्र, आता गेल्या दीड वर्षापासून निर्बंधात असलेल्या मुंबईकरांना माथेरानला जाता येणार आहे.

एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, माथेरान शनिवारपासून खुले करण्याचा निर्णय रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी घेतला आहे. रायगड जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या टक्केवारीत सातत्यानं घट होत आहे. तसंच, ऑक्सिजन खाटा रिकाम्या राहण्याचं प्रमाण वाढत असून, संपूर्ण जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब आहे. या ठिकाणी तिसऱ्या गटातील निर्बंध लावण्यात येणार आहेत. त्यानुसार हॉटेल आणि अन्य सुविधा मर्यादित प्रमाणात सुरू राहणार असून, माथेरानमधील पर्यटनदेखील सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

गेल्या महिनाभरापासून माथेरानमध्ये एकही नवा कोरोनारुग्ण आढळलेला नाही. तसंच, ९५ टक्के माथेरानवासींचं लसीकरण पूर्ण झालं. माथेरानवासीयांचा रोजगार केवळ पर्यटकांवर अवलंबून असल्यानं पर्यटन सुरू करण्याची जोरदार मागणी होत होती. अखेर जिल्हाधिकारी कार्यालयाने पर्यटनास मुभा दिल्याने रोजगार पुन्हा सुरू होणार असून, माथेरान पुन्हा गजबजणार आहे.




हेही वाचा -

सलग दुसऱ्या दिवशी राज्यात लसीकरणाचा विक्रमी उच्चांक

डेक्कन एक्स्प्रेस 'विस्टाडोम'सह २६ जूनपासून पुन्हा धावणार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा