Advertisement

माहुल प्रकल्पबाधित वसाहतीतील सांडपाणी प्रक्रिया केंद्र बंद


माहुल प्रकल्पबाधित वसाहतीतील सांडपाणी प्रक्रिया केंद्र बंद
SHARES

मुंबईतील सर्व जलवाहिनीलगतच्या झोपड्या, तसेच इतर प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन हे माहुलमध्ये एसआरएअंतर्गत बांधलेल्या वसाहतीत करण्यात येत आहे. पण ही वसाहत बांधताना विकासकाने सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारले होते. या प्रक्रिया केंद्राच्या माध्यमातून एफएसआयचा लाभ घेतला. पण हेच सांडपाणी प्रक्रिया केंद्र आता बंद पडले असून विकासकाने हे केंद्र सुरू करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. पण नकार देणाऱ्या या विकासकावर कारवाई करण्याऐवजी महापालिकेने आता प्रक्रिया केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.


यांचे पुनर्वसन माहुलमध्ये प्रकल्पबाधितांच्या वसाहतीत

मुंबई महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात येणाऱ्या विकास कामांमध्ये बाधित होणाऱ्या सरसकट सर्वच कुटुंबांचे पुनर्वसन हे माहुल येथील प्रकल्पबाधितांच्या वसाहतीत केले जात आहे. माहुल येथे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत एका शालेय इमारतीसह १७ इमारतींचे बांधकाम मेसर्स एव्हरस्माईल कन्स्ट्रक्शन कंपनीकडून केले आहे. या सर्व इमारतींमध्ये १७ हजार ४९५ सदनिका, १७२ बालवाड्या, १७२ समाजकेंद्र आणि २ समुदाय केंद्र बांधण्यात येणार होते.


१० हजार १६० सदनिका महापालिकेला हस्तांतरीत

साल २०१२ मध्ये या इमारतींमधील १० हजार १६० सदनिका महापालिकेला हस्तांतरीत करण्यात आल्या. त्यातील ९ हजार ५२० सदनिकांचे वाटप हे तानसा जलवाहिनी, ब्रिमस्टोवॅड प्रकल्प, मोडकळीस आलेल्या इमारतींमधील बाधित कुटुंबांपैकी पात्र कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात येत आहे. सध्या येथील १ हजार २८२ सदनिकांमध्ये रहिवासी वास्तव्यास असून उर्वरीत सदनिकांचे वाटप करणे, तसेच ताबा देण्याचे काम प्रगतीपथावर आहे.


या केंद्राचे नूतनीकरण महापालिका करणार

मात्र, या वसाहतीत एव्हरस्माईल कन्स्ट्रक्शन कंपनीने एसआरए प्रकल्पातील इमारतीमधून तयार होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी मलजल प्रक्रिया केंद्र निर्माण केले होते. २०१२ मध्ये निर्माण केलेले प्रतिदिन १०.३ दशलक्ष लिटर क्षमतेचे मलजल प्रक्रिया केंद्र हे केवळ नावापुरतेच उभारले गेले होते. कारण सध्या ते कार्यरत नाही.

एव्हरस्माईल कन्स्ट्रक्शन कंपनी हे केंद्र चालवण्यास असफल ठरल्यामुळे आता महापालिकेच्याकडून या केंद्राचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. येत्या काही वर्षांत या वसाहतींमध्ये सुमारे ६ ते ७ हजार प्रकल्पग्रस्त या प्रकल्पात पुनर्वसित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मानदंडानुसार सांडपाण्याची विल्हेवाट लावता येणार असल्यामुळे बंद पडलेल्या या मलजल प्रक्रिया केंद्राचे नुतनीकरण करणे आवश्यक असल्याची माहिती मलनि:सारण प्रचलन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे या केंद्राचे नुतनीकरण करून पुढील पाच वर्ष देखभालीसाठी नाईक एन्व्हायर्नमेंट इंजिनीअरींग या कंपनीची निवड करण्यात आली असून यासाठी ३.२१ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.



हेही वाचा

माहुलच्या नरक यातनांच्या पाहणी दौऱ्यातून आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांनी मारली कलटी


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा