SHARE

कुर्ला नेहरु नगरमधील प्रीमियर नाल्याच्या बांधकामाआड येणाऱ्या १५४ झाडांपैकी केवळ दोनच झाडे वाचतील, असे सांगणारी महापालिका आता येथील एकूण २२ झाडे वाचवणार आहे. अर्थात ही झाडे वाचली आहेत ती शिवसेना आणि काँग्रेसच्या जागरुक वृक्ष प्राधिकरणाच्या सदस्यांमुळे. यापूर्वी दोन झाडे वगळता सर्व झाडे कापण्यास आणि पुनर्रोपीत करण्यात प्राधिकरणाच्या सदस्यांनी संमती दिली होती. परंतु महापालिकेतील प्राधिकरणाच्या नव्या सदस्यांनी याला आक्षेप घेत जागेची पाहणी करण्याची मागणी केल्यानंतर प्रत्यक्षात आणखी २० झाडे आहे तशीच ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.


आचारसंहितेमुळे रखडला होता प्रस्ताव

कुर्ला एल विभागातील नेहरु नगर नाला सिस्टीम, फेज दोनमधील प्रीमियर नाला सिस्टीमच्या पुनर्बांधणीत अडथळा आणणाऱ्या १५४ झाडांपैकी ७९ झाडे कापण्याचा, ७३ झाडे पुनर्रोपीत करण्याचा तर उर्वरीत दोन झाडे आहे तशीच ठेवण्याचा प्रस्ताव प्रशासनाने आणला होता. याबाबतचा प्रस्ताव ऑगस्ट २०१६ मध्ये बनवल्यानंतर सर्व कागदपत्रांची पूतर्ता डिसेंबर २०१६ मध्ये केली होती. त्यानंतर फेब्रुवारी २०१७ मध्ये याचा प्रस्ताव आला. परंतु आचारसंहितेमुळे तो मंजूर होऊ शकला नव्हता.


झाडे वाचवण्याचा दावा

या प्रस्तावातील झाडे कापण्यास तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते धनंजय पिसाळ यांनी सहमती दर्शवली होती. परंतु मेमध्ये हा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणापुढे मंजुरीला आला असता, यातील जास्तीत जास्त झाडे वाचवता येणे शक्य असल्याचे असल्याचे सांगत या झाडांची पुन्हा पाहणी करण्याची मागणी सभागृहनेते यशवंत जाधव यांनी केली होती. याला काँग्रेससह राष्ट्रवादी काँगेसनेही पाठिंबा दिला होता. त्यामुळे हा प्रस्ताव बहुमताच्या जोरावर पुन्हा प्रशासनाकडे फेरविचारार्थ पाठवला होता.


२ झाडांच्या जागी २२ झाडे वाचली

त्यानंतर आता प्रशासनाने या नाल्याच्या बांधकामांतील झाडांचा प्रस्ताव आणला असून त्यामध्ये सध्या त्याठिकाणी १५४ झाडे अस्तित्वात असल्याचे सांगितले आहे. त्यापैंकी आणखी २० झाडे वाचवता येणे शक्य असल्याचे म्हटले आहे. यामध्ये ७० झाडे कापण्यास आणि ६४ झाडे पुनर्रोपीत करणे तसेच उर्वरीत २२ झाडे आहे तशीच ठेवणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.


पुनर्रोपीत म्हणजेही कत्तलच

शिवसेना आणि काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस तसेच मनसेही त्यावेळी तीव्र विरोध केल्यामुळे आणखी २० झाडे वाचवण्यात यश आले असून जर हा प्रस्ताव मे महिन्यामध्ये मंजूर केला असता तर २० झाडांची नाहक कत्तल झाली असती. गुरुवारी झालेल्या वृक्षप्राधिकरणाच्या बैठकीत याबाबतचा सुधारीत प्रस्ताव ठेवण्यात आल्यामुळे ही बाब समोर आली आहे. सभागृहनेते यशवंत  जाधव यांनी याचे श्रेय वृक्ष प्राधिकरणाच्या सर्व सदस्यांना दिले असून त्यांच्यामुळेच ही झाडे आपण वाचवू शकलो. 

त्यामुळेच आपण प्रत्येक झाडांची पाहणीची आग्रह धरत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पुनर्रोपीत झाडे ही कापण्यासारखीच असल्याचे सांगत जाधव यांनी आजवर कोणीही यासाठी भरलेली अनामत रक्कम परत घेऊन गेलेले नाहीत. यावरूनच कोणीही झाडे पुनर्रोपीत करत नसून ती झाडे मारलीच जात असल्याच आरोप त्यांनी केला.हेही वाचा

पारसी कॉलनीचा हेरिटेज लूक बिघडणार?

मेट्रो 3 : झाडांची कत्तल रोखण्यासाठी शेवटची धाव!डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
ताज्या बातम्या