महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी राज्य सरकारने आता महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पोलिसांना आता पिडीत महिलेकडून आलेल्या तक्रारीवर २४ तासांच्या आत कारवाई करावी लागणार आहे. राज्य सरकारने तसे आदेश देऊन त्याची अंमलबजावणी करण्याची सूचना राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, अधीक्षकांना करण्यात आली आहे.
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे एका शिक्षिकेची पेट्रोलने पेटवून हत्या करण्यात आल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. याशिवाय राज्यातही इतर ठिकाणी महिलांवरील अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहे. त्यामुळे महिलांवरील अत्याचाराला रोखण्यासाठी गृहविभागाने कठोर उपाययोजना राबविण्याचे आदेश पोलीस महासंचालकांना दिले आहेत. राज्य सरकारकडून पोलिसांना नवीन २३ शिफारशी व सूचना करण्यात आल्या आहेत. या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आणि कार्यवाहीचा आढावा घेण्याचेही आदेशही देण्यात आले आहेत.
राज्य सरकारने पोलिसांना दिलेल्या सूचनांनुसार, एखाद्या महिलेने अत्याचाराची तक्रार केल्यास पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांकडून पीडितेचा जबाब नोंदवून २४ तासांच्या आत योग्य कायदेशीर कारवाई पूर्ण करावयाची आहे. त्यानंतर त्यासंबंधी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती द्यायाची आहे. पोलीस ठाण्यातील प्रत्येक महिला अधिकारी व अंमलदार यांना हद्दीतील शाळा, महाविद्यालये नेमून द्यायची असून, त्यांनी त्या ठिकाणी वेळोवेळी भेट देऊन पाहणी करावयाची आहे. त्याचप्रमाणे, पोलीस काका, पोलीस दिदी ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी, महिलांवरील अत्याचारासंबंधी जनजागृती करताना प्रचलित कायदे, त्यातील तरतुदी व शिक्षेबाबतही माहिती द्यावयाची आहे. त्याचा आढावा संबंधित प्रभारी अधिकाऱ्यांनी घ्यायचा आहे.
हेही वाचा -