Advertisement

22 लाख पगाराच्या ट्री सर्जनच्या नियुक्तीचा फार्सच !


22 लाख पगाराच्या ट्री सर्जनच्या नियुक्तीचा फार्सच !
SHARES

मेट्रो-3 मधील झाडांच्या कत्तली आणि पुनर्रोपन योग्य रित्या शास्त्रोक्त पद्धतीने करण्यासाठी 22 लाख महिना पगार देत सिंगापूरमधील 'ट्री सर्जन'ची नियुक्ती करण्यात आल्याचे मोठ्या तोऱ्यात सांगणाऱ्या मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशन (एमएमआरसी) च्या दाव्याचा अखेर पर्दाफाश झाला आहे. कारण ज्या सिंगापूरमधील सिमॉन लिआँग नावाच्या 'ट्री सर्जन'ची नियुक्ती एमएमआरसीकडून करण्यात आली होती, त्याच सिमॉन लिआँगने आपली नियुक्ती मेट्रो-3 प्रकल्पासाठी झालेली नसल्याचे एका ई-मेलद्वारे 'सेव्ह ट्री' ग्रुपला कळवले आहे. त्यामुळे ही मुंबईकरांची फसवणूक असल्याचेही 'सेव्ह ट्री'ने स्पष्ट केले आहे.

झाडांची कत्तल आणि पुनर्रोपणासाठी 22 लाख रुपये पगाराच्या 'ट्री सर्जन'ची नियुक्ती केल्याचे वृत्त काही महिन्यांपूर्वी 'मुंबई लाइव्ह'ने सर्वप्रथम प्रसिद्ध केले होते. उच्च न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयाने झाडांच्या कत्तलीला हिरवा कंदिल दाखवल्यानंतर एमएमआरसीकडून झाडे कापण्याच्या कामाला वेग दिला. त्यावेळी कुठेही हा 'ट्री सर्जन' मुंबईत दिसला नाही. त्यामुळे 22 लाख पगाराचा 'ट्री सर्जन' गेला कुणीकडे?' या मथळ्याखाली 'मुंबई लाइव्ह'ने ट्री सर्जन गायब असल्याचे वृत्त 4 जून रोजी प्रसिद्ध केले होते. 'मुंबई लाइव्ह' सातत्याने या 'ट्री सर्जन'चा शोध घेत होते. अखेर हा शोध संपला आहे. 'सेव्ह ट्री'च्या सदस्यांनी सिमॉन लिआँगचा ई-मेल आयडी शोधून काढत त्याच्याकडे मेट्रो-3 साठी आपली नियुक्ती करण्यात आली असून आपण मुंबईत आलात का? यासंबंधीची विचारणा केली असता धक्कादायक माहिती समोर आली.


हे देखील वाचा -

22 लाख पगाराचा 'ट्री सर्जन' गेला कुणीकडे?


सिमॉन लिआँगच्या ई-मेलनुसार आपल्याला एमएमआरसीकडून विचारणा झाली होती. पण, आपली या कामासाठी नियुक्तीच झालेली नसल्याचे कळवल्याची माहिती 'सेव्ह ट्री'चे सदस्य झोरू बाथेना यांनी दिली आहे. इतकेच नव्हे तर, 22 लाख महिना पगार अशा पगाराची आपण मागणी केली नसल्याचेही सिमॉन लिआँगने म्हटले आहे. हा ई-मेल म्हणजे मेट्रो-3 मधील झाडांच्या कत्तलीचा घोटाळा उघड करणारा असल्याचे म्हणत बाथेना यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. यासंबंधी उच्च न्यायालयाच्या समितीकडेही तक्रार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.

उच्च न्यायालयाचीही दिशाभूल

झाडांच्या कत्तलीसंदर्भातील याचिकेदरम्यान एमएमआरसीने प्रतिज्ञापत्र सादर करत ट्री सर्जनच्या उपस्थितीत झाडांची कत्तल आणि पुनर्रोपन करण्याची हमी दिली होती. पण, आता 'ट्री सर्जन'ची नियुक्तीच झाली नसल्याचे समोर आल्याने एमएमआरसी उच्च न्यायालयाचीही दिशाभूल करत असल्याचा आरोप 'सेव्ह ट्री'ने केला आहे. दरम्यान, 'मुंबई लाइव्ह'ने एमएमआरसीकडे 'ट्री सर्जन'च्या बाबतीत वारंवार विचारणा केली आहे. मात्र, एमएमआरसीकडून याबाबत कोणतेही उत्तर मिळालेले नाही. आता तर अधिकारी, प्रवक्ता नॉट रिचेबल झाले आहेत.


हे देखील वाचा - 

मेट्रोसाठी बोलावला 34 लाखांचा ट्री सर्जन


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा