Advertisement

मुंबईत टेक्सटाईल म्युझियमच्या कामाला लवकरच सुरुवात


मुंबईत टेक्सटाईल म्युझियमच्या कामाला लवकरच सुरुवात
SHARES

काळाचौकीतील बहुचर्चित टेक्सटाईल म्युझियमच्या अर्थात वस्त्रोद्योग संग्रहालय व सांस्कृतिक केंद्र बनवण्याच्या कामाला गती मिळत असून याच्या पहिल्या टप्प्यातील कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. वस्त्रोद्योग संग्रहालयासाठी इंडिया युनायटेड मिल २ व ३मधील परिसराचे सुशोभिकरण करून त्या ठिकाणी प्लाझा आणि गिरण्यांवर आधारीत म्युरल बनवण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.


गिरण्यांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणार

मुंबईची ओळख असलेल्या कापड गिरण्या बंद होऊन त्या जागांवर व्यावसायिक व निवासी इमारतींचा विकास होत आहे. त्यामुळे मुंबईतील कापड गिरण्यांचा इतिहास सर्वांना माहीत व्हावा यासाठी राज्य शासन, मुंबई महापालिका आणि राष्ट्रीय वस्त्रोद्योग मंडळाच्या पुढाकाराने मुंबईतील मध्यवर्ती भागात असलेल्या काळाचौकी येथील इंडिया युनायटेड मिल येथे वस्त्रोद्योग संग्रहालय व सांस्कृतिक केंद्र निर्माण करून भावी पिढीला मुंबईच्या कापड गिरण्यांच्या इतिहासाची ओळख करून दिली जाणार आहे.


जे. जे. महाविद्यालय प्रकल्प सल्लागार

या वस्त्रोद्योग संग्रहालय आणि सांस्कृतिक केंद्रासाठी महापालिकेकडून जे. जे. महाविद्यालयाची प्रकल्प सल्लागार म्हणून निवड केली होती. त्यानुसार महापालिकेच्या ताब्यात आलेल्या मिलच्या एकूण ४४ हजार चौरस मीटर जागेपैकी पहिल्या टप्यात ७ हजार चौरस मीटरच्या जागेवर मुंबईतील गिरण गावाचे जीवन व गिरणीबाबत नवीन पिढीला माहिती देण्यासाठी वस्त्रोद्योगाची म्युरल तसेच सुशोभिकरण करून व्हिडिओच्या माध्यमातून प्रदर्शन करण्याचा प्रस्ताव आहे. त्याअंतर्गत तळ्याचे व परिसराचे सुशोभिकरण व सर्व प्रकारच्या वापरासाठीचे प्लाझा यांच्या बांधकामासाठी ७.२८ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव सध्या महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.


दुसऱ्या टप्प्यात काय असणार?

टेक्सटाईल म्युझियमच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये ३७ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेवर विकास केला जाणार आहे. यामध्ये वस्त्रोद्योग संग्रहालय, कलादालन, विविध कलाप्रदर्शनासाठी सभागृह आदींची कामे केली जाणार आहेत. यासाठी मुंबई सांस्कृतिक वारसा जतन समिती व अन्य खात्यांची मंजुरी घेऊन लवकरच निविदा मागवण्यात येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा