Advertisement

महापौर, सभागृहनेत्यांचे ‘खोटे बोल’


महापौर, सभागृहनेत्यांचे ‘खोटे बोल’
SHARES

मुंबई - राणीबागेतील पाहुण्या पेंग्विन पक्ष्यांचे दर्शन आता अखेर मुंबईकरांना होणार असून पेंग्विन दर्शनाचा उद्घाटन सोहळा येत्या शुक्रवारी 17 मार्च रोजी होणार आहे. परंतु उद्घाटनाचा कार्यक्रम निश्चित होऊन निमंत्रण पत्रिकाही छापून झाल्या तरी मुंबईचे महापौर, सभागृहनेते हे आपल्याला याची कोणीतीही कल्पना नसल्याचे जाहीरपणे सांगत सुटले आहेत. महापौर आणि सभागृनेत्यांशी चर्चा करूनच विभागाने उद्घाटनाची तारीख निश्चित केली तरीही ही मंडळी बेमालूनपणे खोटे बोलत आपल्याला काहीच माहीत नसल्याचे प्रसारमाध्यमांना सांगत आहेत. त्यामुळे महापौर आणि सभागृहनेत्यांच्या या खोट्या बोलण्यामागे नक्की लपलंय काय असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पेंग्विन कक्षाचे उद्घाटन शुक्रवारी होणार असून 31 मार्चपर्यंत मुंबईकरांना राणीबागमध्ये विनामूल्य प्रवेश दिला जाणारआहे. त्यानंतर मात्र पेंग्विन पाहण्यासाठी प्रौढांना 100 रुपये आणि लहान मुलांसाठी 50 रुपये शुल्क मोजावे लागणार आहे.

मागील वर्षी जुलैमध्ये दक्षिण कोरियातून आठ हम्बोल्ट पेंग्विन आणल्यापासून पालिकेत राजकारण सुरू आहे. यापैकी एका पेंग्विनचा मृत्यू झाल्यामुळे पेंग्विनना मुंबईचे वातावरण मानवणार नसल्याने त्यांना परत पाठवण्याची मागणी प्राणीमित्र आणि राजकीय नेत्यांनी केली आहे. मात्र या वादावर मात करत पालिकेने आधुनिक वैद्यकशास्त्राचा वापर करत पेंग्विन राणीबागमध्येच राहातील याची काळजी घेतली आहे. पेंग्विनना ठेवण्यात येणाऱ्या कक्षाचा हवा आणि पाण्याचा अनुकूल अहवाल आल्यानंतर सहा मार्चला सर्व सात पेंग्विनना मुख्य कक्षात हलवण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई महापौर निवडीनंतर पेंग्विनचे दर्शन मुंबईकरांना होणार हे स्पष्ट झाले होते.

शुक्रवारी उद्घाटनाचा हा कार्यक्रम होणार असतानाही महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि सभागृहनेते यशवंत जाधव यांनी ही तारीख माध्यमांपासून लपवण्याचा प्रयत्न केला. महाडेश्वर आणि जाधव यांना मंगळवारी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारल्यानंतर आपल्याला याबाबत काहीच माहित नसल्याचे सांगितले. विशेष म्हणजे दुपारी महापौर महाडेश्वर आणि सभागृहनेते जाधव यांनी सामान्य प्रशासनाचे उपायुक्त आणि राणीबागेची जबाबदारी संभाळणाऱ्या उपायुक्त सुधीर नाईक आणि जनसंपर्क अधिकारी विजय खबाले यांच्याकडून माहिती घेऊन निमंत्रण पत्रिकांमध्ये सुधारणाही केल्या. परंतु हे सर्व माहिती असूनही महापौर आणि सभागृहनेत्यांनी माहिती दिली. परंतु सर्व चॅनेल्स आणि वृत्तवाहिन्यांवर बातमी आल्यानंतर बुधवारीही महापौर महाडेश्वर आणि सभागृहनेते जाधव यांनी या उद्घाटनाची माहिती न देता ही तारीखच लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी याबाबत काहीही बोलण्यास नकार देत आपण माहिती घेऊन सांगतो, असे ते म्हणाले. त्यामुळे महापौर आणि सभागृहनेत्यांच्या या खोट्या बोलाची चर्चाच अधिक रंगली आहे. महापौर आणि सभागृहनेत्यांच्या या प्रारंभीच खोटे बोलण्याच्या प्रतापामुळे पुढे ही मंडळी मुंबईकरांशी किती प्रमाणिक राहतील याबाबतच प्रश्न उपस्थित होत आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा