Advertisement

भारतीय क्रिकेट संकटात, गांगुलीने लिहिलं 'बीसीसीआय'ला पत्र

दिग्गज क्रिकेटर्स आणि मंडळातील प्रशासकांनी अनेक वर्षे केलेल्या मेहनतीच्या जोरावरचं भारतीय क्रिकेटचा डोलारा उभा राहिला आहे. याचमुळे हजारो प्रेक्षक क्रिकेट बघण्यासाठी मैदानात येतात. परंतु हे सर्वकाही संकटात असल्याचं मला वाटत आहे. अपेक्षा आहे की माझं म्हणणं ऐकण्यात येईल. असं गांगुलीने आपल्या पत्रात म्हटलं आहे.

भारतीय क्रिकेट संकटात, गांगुलीने लिहिलं 'बीसीसीआय'ला पत्र
SHARES

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळा (बीसीसीआय)ला पत्र लिहून भारतीय क्रिकेट संकटात असल्याचं म्हटलं आहे. 'बीसीसीआय'चे सीईओ राहुल जोहरी यांच्यावर लागलेले लैंगिक छळाचे आरोप असोत किंवा त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत निर्माण झालेला गोंधळ असो, सध्या मंडळात जो काही कारभार सुरू आहे, त्यावर तिखट शब्दांत टीका करत गांगुलीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.


प्रेक्षकांमध्ये प्रतिमा मलिन

बीसीसीआयचे सचिव अमिताभ चौधरी आणि बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष सी.के. खन्ना यांना ई-मेल पाठवून गांगुलीने मंडळातील कामकाजाच्या अनेक मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याने आपल्या पत्रात लिहिलं आहे की, ''सध्या भारतीय क्रिकेटमध्ये जे काही सुरू आहे, त्याला घाबरून मी हे पत्र आपल्याला लिहित आहे. मी हा खेळ दिर्घकाळ खेळलो आहे. जिथं आमचं आयुष्य केवळ हारणं आणि जिंकणं एवढ्यापुरतंच मर्यादीत होतं. भारतीय क्रिकेटची प्रतिमा आमच्यासाठी महत्त्वपूर्ण असायची. पण सद्यस्थितीत प्रेक्षकांमध्ये भारतीय क्रिकेटची प्रतिमा मलिन होताना दिसत आहे.''


राहुल जोहरी प्रकरण

राहुल जोहरी यांच्यावरील आरोपांबाबत गांगुलीने म्हटलं आहे की, ''मला माहीत नाही की यात तथ्य आहे किंवा नाही. परंतु या लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे बीसीसीआयची प्रतिमा खूप खराब झाली आहे. खासकरून ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळलं आहे. 'सीओए'ची चार सदस्यीय समिती आता २ सदस्यीय समिती झाली असून समिती दोन गटांत विभागली आहे.''


कामकाजात मनमानी

''क्रिकेटचे नियम ऐन सीझनमध्ये बदलण्यात येतात. आतापर्यंत असं कधीही झालं नव्हतं. समितीने घेतलेल्या निर्णयाचा सन्मान करण्याऐवजी ते अचानक बदलण्यात येतात. प्रशिक्षक निवडीचा माझा अनुभव तर घाबरवणाराच (याविषयी अधिक न बोललेलंच बरं) होता. मंडळात कार्यरत असलेला माझा एक मित्र मला येऊन विचारतो की मी नेमका कुणाकडे जाऊ? आणि माझ्याकडे त्यावर उत्तर नसतं. मला दुसऱ्या असोसिएशनला विचारावं लागलं की आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी कुणाला निमंत्रण द्यावं? कारण नेमकं काय चाललंय हेच मला ठाऊक नाही.''


क्रिकेटचा डोलारा संकटात

''दिग्गज क्रिकेटर्स आणि मंडळातील प्रशासकांनी अनेक वर्षे केलेल्या मेहनतीच्या जोरावरचं भारतीय क्रिकेटचा डोलारा उभा राहिला आहे. याचमुळे हजारो प्रेक्षक क्रिकेट बघण्यासाठी मैदानात येतात. परंतु हे सर्वकाही संकटात असल्याचं मला वाटत आहे. अपेक्षा आहे की माझं म्हणणं ऐकण्यात येईल.'' असं गांगुलीने आपल्या पत्रात म्हटलं आहे.



हेही वाचा-

रोहित शर्माचा हा व्हिडिओ पाहिलात का?

#MeToo: जोहरी यांना निलंबित करा, ७ राज्यातील क्रिकेट मंडळांची मागणी



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा