विराट कोहलीच्या अनुपस्थितीत श्रीलंकन गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरला अाहे तो म्हणजे मुंबईकर रोहित शर्मा. रोहितनं काही दिवसांपूर्वी वनडे क्रिकेटमध्ये द्विशतकांची हॅटट्रिक साजरी केली होती. अाज रोहितनं पुन्हा एकदा श्रीलंकन गोलंदाजांची पिसं काढत टी-२० मध्ये अाणखी एका विक्रमाशी बरोबरी साधली. ३५ चेंडूंमध्ये शतकाला गवसणी घालत रोहितनं टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतकाच्या विक्रमाशी बरोबरी साधली. वेगवान शतक झळकावणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला.
दोन महिन्यांपूर्वी पोचेफस्ट्रूम इथं डेव्हिड मिलर नावाचं वादळ घोंघावलं होतं. दक्षिण अाफ्रिका संघ ३ बाद ७८ अशा अडचणीत असताना पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरत डेव्हिड मिलरनं बांगलादेशच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला होता. अवघ्या ३५ चेंडूंत ७ चौकार अाणि ९ षटकारांची अातषबाजी करत मिलरनं टी-२० क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतक नोंदवलं होतं. अाज रोहित शर्माने त्या विक्रमाशी बरोबरी साधली.
श्रीलंकन गोलंदाजांवर तुटून पडलेल्या रोहितनं अाज पुन्हा एकदा चौकार-षटकारांची अातषबाजी केली. इंदूरच्या होळकर स्टेडियमवर प्रेक्षकांना रो'हिट' शर्माचा जलवा पाहायला मिळाला. रोहितनं ३५ चेंडूंचा सामना करत ११ चौकार अाणि ८ षटकारांच्या मदतीने १०१ धावा फटकावल्या अाणि अापल्या टी-२० कारकीर्दीतलं दुसरं शतक साजरं केलं. या कामगिरीच्या जोरावर सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा विक्रम रोहितनं मिलरसह अापल्या नावावरही केला. रोहितची खेळी मात्र ४३ चेंडूंत १२ चौकार अाणि १० षटकारांनिशी ११८ धावांवर संपुष्टात अाली.
हेही वाचा -
मुंबईकर रोहित शर्माची द्विशतकाची हॅटट्रिक
रोहित शर्माने कोणकोणते नवीन रेकॉर्ड आपल्या नावे केले? वाचा