आईला शिवी दिल्याचा राग, मुंबईत २१ वर्षीय तरुणाची हत्या

मुंबईतील अंधेरी पूर्व भागात हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती आहे.

आईला शिवी दिल्याचा राग, मुंबईत २१ वर्षीय तरुणाची हत्या
SHARES

आईला शिवी दिल्याच्या रागातून तरुणानं आपल्या शालेय मित्राची हत्या केली. मुंबईतील अंधेरी पूर्व भागात हा धक्कादायक प्रकार (Mumbai Crime) घडल्याची माहिती आहे. याप्रकरणी २२ वर्षीय तरुणाला रविवारी अटक करण्यात आली.

महिन्याचा पगार झाल्यामुळे आरोपीनं मित्राला पार्टीसाठी बोलावलं होतं. यावेळी दोघं जण मद्यपान करत होते. तेव्हा २१ वर्षीय तरुणानं आरोपीला त्याच्या आईवरुन शिवी घातली. याचा राग सहन न झाल्यामुळे आरोपीनं मित्राची हत्या केल्याचा दावा केला आहे. इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.

मृत राहुल गायकवाड (२१) आणि आरोपी सुशांत घोटकर (२२) हे शाळेत असल्यापासून चांगले मित्र होते. राहुल बेरोजगार होता. तर आरोपी सुशांत हाऊसकीपिंगचे काम करत होता.

११ फेब्रुवारीला सुशांतला पगार मिळाल्यानं दोघांनी पार्टी करण्याचा निर्णय घेतला. अंधेरी इथं तीन ठिकाणी त्यांनी मद्यपान केले. मद्यधुंद अवस्थेत मरोळ मरोशी रस्त्यावर फिरत असताना दोघांमध्ये वाद झाला. यावेळी राहुलनं सुशांतच्या आईला शिवीगाळ केली. त्यामुळे चिडलेल्या सुशांतनं संतापाच्या भरात राहुलला पेव्हर ब्लॉकनं मारहाण केली. राहुलच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत असल्याचं पाहून सुशांत घाबरला आणि त्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला.

एका पादचाऱ्याने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करुन सांगितलं, की डोक्याला मार लागल्याने एक व्यक्ती रस्त्यात बेशुद्ध पडली आहे. त्यानंतर पोलिस व्हॅन घटनास्थळी पाठवण्यात आली आणि राहुल गायकवाड याला कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण १२ फेब्रुवारी रोजी राहुलचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.

राहुलच्या फोनच्या मदतीने पोलिसांनी तो मरोळ भागातील आदर्श नगर इथला रहिवासी असल्याची ओळख पटवली. त्याच्या भावाच्या तक्रारीवरून खुनाचा एफआयआर दाखल करण्यात आला. तपासा दरम्यान पोलिसांना कळाले की मयत तरुण आरोपीला शेवटचा भेटला होता. त्यानंतर सुशांतला अटक करण्यात आली.



हेही वाचा

राजस्थानवरून मुंबईत हेरॉईन विकण्यासाठी आलेल्या टोळीचा पर्दाफाश

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा