आगीत होरपळतानाही 'त्याला' होती कुटुंबाची चिंता

उत्तर प्रदेशातील बलरामपूरधील रकीब चारच महिन्यांपूर्वी मुंबईत नोकरीसाठी आला होता. अब्दुलच्या लग्नासाठी त्याच्या कुटुंबीयांचे प्रयत्न सुरु होते. मात्र त्यापूर्वीच काळाने त्याच्यावर झडप घातली.

आगीत होरपळतानाही 'त्याला' होती कुटुंबाची चिंता
SHARES

गोरेगावमधील टेक्निक प्लस काॅम्प्लेक्सला रविवारी आग लागलेली असताना आता या आगीत आपण वाचणार नाही, त्यामुळे आपल्यानंतर आपल्या कुटुंबाचं काय होणार? या विवंचनेतून एका तरूण कामगाराने आपल्या भावाला फोन करून स्वत:च्या एटीएमचा पासवर्ड दिला. एटीएममधून पैसे काढून ते कुटुंबाला देण्यास सांगितले अन् अखेरचा श्वास घेतला. अब्दुल रकीब (२३) असं या तरूणाचं नाव आहे.

ही काळीज हेलावून टाकणारी घटना सर्वांसमोर आली ती, मृताच्या भावाला मंगळवारी मृताची ओळख पटवण्यासाठी गोरेगावच्या सिद्धार्थ रुग्णालयात बोलावल्यानंतर.

उत्तर प्रदेशातील बलरामपूरधील रकीब चारच महिन्यांपूर्वी मुंबईत नोकरीसाठी आला होता. अब्दुलच्या लग्नासाठी त्याच्या कुटुंबीयांचे प्रयत्न सुरु होते. मात्र त्यापूर्वीच काळाने त्याच्यावर झडप घातली.


'अशी' घडली आगीची घटना

गोरेगाव पश्चिमेडील टेक्निक प्लस वन काॅम्प्लेक्सला रविवारी सायंकाळी शाॅर्ट सर्किटमुळे आग लागली. दुसऱ्या मजल्यावरून आठव्या मजल्यापर्यंत पसरलेल्या या आगीत १० ते १२ कामगार अडकले होते. आग लागल्याची माहिती मिळताच हे कामगार इतरांना इमारतीबाहेर काढू लागले, त्यात अंधेरीतील साकिनाका परिसरात राहणारा अब्दुल रकीब हा देखील होता.


'असा' अडकला आगीत

आगीत अडकलेल्या बहुतांश कामगारांना इमारतीबाहेर पळ काढण्यात यश आलं असलं, तरी आगीच्या ज्वाळांमुळे ७ व्या मजल्यावर अडकलेल्या रकीबला दरवाजापर्यंत जाणं अवघड झालं. यातून आपण सुखरूप बाहेर पडू याची शाश्वती न वाटल्याने रकीबने आपला भाऊ तौफिलला फोन केला. ''मी आगीत अडकल्यामुळे आता वाचू शकणार नाही, तेव्हा एटीएममधील पैसे काढून ते कुटुंबाच्या हवाली कर,'' असं म्हणत रकीबने त्याला आपल्या एटीएमचा पासवर्ड सांगितला.


सातव्या मजल्यावर आढळला मृतदेह

पण, तौफिकने त्याला हार न मानता एखाद्या खिडकीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न कर असा धीर देण्याचा प्रयत्न केला. मात्र नियतीच्या खेळापुढं कुणाचंही काहीच चाललं नाही. मंगळवारी अग्निशमन दलाच्या जवानांना रकीबचा मृतदेह सातव्या मजल्यावरील इलेक्ट्रिक रुममध्ये आढळला. रकीबने आगीच्या ज्वाळांपासून वाचण्यासाठी या रुमचा आधार घेतला असावा, असा अग्निशमन दलाच्या जवानांचा अंदाज आहे.


मृतांचा आकडा ५ वर

यामुळे टेक्निक प्लस काॅम्प्लेक्सला लागलेल्या आगीतील मृतांचा आकडा ५ वर जाऊन पोहोचला आहे. तसंच या आगीत ९ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी ८ जण अग्निशमन दलातील अधिकारी, कर्मचारी असून यापैकी २ जणांवर गोरेगावच्या सिद्धार्थ रुग्णालयात उपचार सुरु आहेत.



हेही वाचा-

काचेच्या इमारतींमधील सेंट्रलाईज्ड एसी ठरतात कर्दनकाळ

गोरेगाव आग प्रकरणी तिघांना अटक



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा