रुग्णालयातूनच रेमडेसिवीर इंजेक्शन चोरणाऱ्या नर्सचा पर्दाफाश, ५ साथीदारांसह अटक

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं गुजरातहून आलेल्या अशाच एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे जो रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकत होते.

रुग्णालयातूनच रेमडेसिवीर इंजेक्शन चोरणाऱ्या नर्सचा पर्दाफाश, ५ साथीदारांसह अटक
SHARES

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या आकडेवारीत काही प्रमाणात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. असं असलं तरी बऱ्याच रुग्णालयात ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनची कमतरता आहे. पण या परिस्थितीतही रेमडिसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार केला जात आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अशाच एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

गुन्हे शाखेच्या युनिट १२ ने गोरेगावात कारवाई करून रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा साठा हस्तगत केला. गोरेगाव पश्चिमेला असणाऱ्या मोतीलाल नगर परिसरात लिंक रोडनजीक एका हॉटेलच्या किचनमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन्स दडवून ठेवण्यात आली होती. ही इंजेक्शन्स १८ हजार इतक्या किंमतीत रुग्णांच्या नातेवाईकांना विकली जात होती.

पोलिसांनी धाड टाकून २६ रेमडेसिविर इंजेक्शन्स जप्त केली. याप्रकरणी पोलिसांनी ६ आरोपींना ताब्यात घेतलं आहे. गुजरातमधून रेमडेसिवीर इंजेक्शन्स आणून ही टोळी मुंबईत चढ्या भावानं विकत असल्याचं उघड झालं आहे.

गुन्हे शाखेच्या युनिट १२ला यासंदर्भात माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली. अटक केलेल्या ६ जणांमध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. ही महिला एका रुग्णालयात नर्सचं काम करते. 

कोविड केअर रुग्णालयातून ही नर्स रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा चोरून तिच्या साथीदारांना देत असे. कुणाला शंका येऊ नये म्हणून नर्स मृत रुग्णांच्या नावावर इंजेक्शन वापरत असल्याची नोंदणी करत असे. त्यानंतर तिचे साथीदार हे इंजेक्शन चढ्या भावानं बाजारात विकत असे.   

दरम्यान, केंद्र सरकारनं राज्य सरकारला दर दिवसाला ४० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याचं मान्य केलं होतं. पण प्रत्यक्षात २६ हजार दिले जात असल्याची माहिती अन्न औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सोमवारी दिली.

केंद्र सरकारनं २१ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत राज्याला १ लाख २६ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन देऊ केले होते. मात्र, राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे कोटा वाढवून देण्याची मागणी केली होती. पंतप्रधानांनी मागणी मान्य करत कोटा वाढवून दिला होता.

त्यानुसार ४ लाख ५० हजार रेमडेसिवीरचा कोटा निर्धारित केला गेला. वाढवलेल्या कोट्यानुसार केंद्र सरकारनं राज्याला २१ एप्रिल ते ३० एप्रिलदरम्यान दरदिवशी ४० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन देणं आवश्यक आहे. प्रत्यक्षात फक्त २६ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होत आहेत.हेही वाचा

कोरोनाचा बनावट अहवाल ५०० रुपयात, भिवंडीत पॅथॉलॉजी लॅबचा पर्दापाश

ठाणे ग्लोबल हॉस्पिटलमध्ये आयसीयू बेडसाठी पैसे घेणाऱ्या ५ जणांविरुद्ध गुन्हा

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा