'पीएनबी' घोटाळ्यानंतरही नीरव मोदीचे व्यापाऱ्यांशी व्यवहार सुरूच


'पीएनबी' घोटाळ्यानंतरही नीरव मोदीचे व्यापाऱ्यांशी व्यवहार सुरूच
SHARES

हिरे व्यापारी नीरव मोदीने पीएनबी बँकेला ११ हजार ४०० कोटी रुपयांचा चुना लावून परदेशात फरार झाल्यानंतर त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली अाहे. मात्र भारतातील हिरे व्यापाऱ्यांना हाताशी धरून तो आजही विविध करार करत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. काही दिवसांपूर्वीच सूरतच्या एका व्यापाऱ्यासोबत नीरवने २८ फेब्रुवारीला साडे तीन लाख डाॅलरचा करार केला आहे. दुसरीकडे पीएनबी घोटाळ्याची रक्कम दिवसेंदिवस वाढत आहे. पीएनबी बँकेत आतापर्यंत १२६३८ कोटींचा घोटाळा झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र सीबीआय तपासात ही रक्कम २८०.६ कोटींनी वाढून ती १२९१८.६ कोटी इतकी झाली आहे. दरम्यान, या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने तिसरा गुन्हा नोंदवला असून घोटाळ्यातील वाढती रक्कम लक्षात घेता, सीबीआय, ईडी आणि डीआरआयकडून नीरव मोदी आणि त्याच्या सहकाऱ्यांभोवती चौकशीचा फास आवळला जात आहे.


मोदीच्या कंपन्यांविरुद्ध न्यायालयीन प्रक्रिया 

प्रसिद्ध हिरे व्यापारी आणि पीएनबी घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार नीरव मोदीने फ्लॅगशिप फायरस्टार ग्रुपसह विविध कंपन्यांशी हातमिळवणी करून पीएनबीला २८०.६ कोटींचा चुना लावला आहे. मोदीच्या कंपन्यांसाठी बँकेने फंड बेस्ड आणि नॉन फंड बेस्ड लिमिट तयार केले होते. मात्र ज्या कामासाठी मंजुरी देण्यात आली, त्यासाठी त्याचा उपयोग झालाच नाही. नीरव मोदी, मेहुल चोक्सी आणि त्यांच्या कंपन्यांनी पीएनबीच्या अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करत बँकेची फसवणूक केल्याचं सीबीआयने म्हटलं आहे. १४ फेब्रुवारीला सुरतच्या एका हिरे व्यापाऱ्याला स्टेट बँकेतून साडे तीन लाख डाॅलर्स पाठवण्यास सांगितले होते. हे पैसे सूरतच्या व्यापाऱ्याने मोदीच्या बेल्जियमच्या अँटव्हर्प खात्यात वळवले. इतकंच नव्हे तर नीरव मोदीने सूरतच्या एका व्यापाऱ्याशी २८ फेब्रुवारीला नवा करार केल्याचे बोलले जाते. त्यामुऴे घोटाळा उघडकीस येऊन २८ दिवस उलटत नाही, तोच नीरव अजूनही भारतातील व्यापाऱ्यांना हाताशी धरून नवनवीन करार करत आहे. त्यामुळे डीआरआयने मोदीच्या तीन कंपन्यांविरोधात न्यायालयीन प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे.


भारत सरकारची केली होती दिशाभूल

याआधी डीआरआयच्या चौकशीत नीरव मोदीने कमी किंमतीतील हिऱ्यांचे मूल्य कमी दाखवून भारत सरकारची फसवणूक केली होती. मात्र बाजारात त्याच हिऱ्यांची किंमत वाढवली होती. अमेरिका, हाँगकाँग, कॅनडा, संयुक्त अरब अमिरातीमध्ये निर्यात केलेल्या दागिन्यांमध्ये कमी प्रतीचे व कमी किंमतीचे दागिने वापरण्यात आले होते. तर २०१५ मध्ये हाँगकाँग व संयुक्त अरब अमिरातीमध्ये निर्यात केलेल्या हिरेजडित सोन्यांच्या दागिन्यांची किंमत अवघी पाच कोटी असताना मोदीच्या कंपन्यांनी त्याचे मूल्य ९४ कोटी असल्याचे सांगत दिशाभूल केल्याचे चौकशीत पुढे आले आहे.


हेही वाचा -

पीएनबी घोटाळा: मेहुल चोकसीची १२१७ कोटींची मालमत्ता जप्त

वाचा ‘कसा’ झाला 'पीएनबी'चा महाघोटाळा

नीरव मोदी-पीएनबी घोटाळ्याचा टी-२० मुंबई लीगला फटका!

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा