मॅट्रिमोनिअल साईट जोडीदार शोधताना ‘घ्या’ काळजी, मंत्री यशोमती ठाकूर यांचे आवाहन


मॅट्रिमोनिअल साईट जोडीदार शोधताना ‘घ्या’ काळजी, मंत्री यशोमती ठाकूर यांचे आवाहन
SHARES

विवाहविषयक (मॅट्रिमोनियल) वेबसाईटवर सायबर भामट्यांकडून ऑनलाईन आर्थिक फसवणूक होऊ शकते. अशा साईट वापरताना सावधगिरी बाळगावीत, फसवणुकीचे प्रकार लक्षात येताच गप्प न राहता पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी बुधवारी केले.बऱ्याचदा पालक किंवा मुलगा /मुलगी स्वतः या वेबसाईटवर प्रोफाईल बनवून त्यात आपली माहिती ,परिवाराची माहिती व फोटो अपलोड करत आहेत . अशा वेबसाईट या सायबर भामट्यांकरिता या लोकांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करण्यासाठी किंवा हा सर्व डेटा डार्कनेटवर किंवा इंटरनेटच्या काळ्या बाजारात विकण्यास एकदम सोपे असे लक्ष्य आहे.

हेही वाचाः- पक्ष वाढवायचा असेल तर.., चंद्रकांत पाटलांनी दिला राज ठाकरेंना ‘हा’ सल्ला

अशा वेबसाईटद्वारे ऑनलाईन फसविले जाणाऱ्यांची संख्यादेखील बऱ्याच प्रमाणात आहे. दुर्दैवाने यामध्ये फसविले गेलेल्यांमध्ये मुलींची संख्या ही मुलांच्या तुलनेने जास्त आहे. असे गुन्हे रोखण्यासाठी मुंबईचे सायबर पोलिस आता मॅट्रिमोनिअल साईटवरून होणाऱ्या सायबर गुन्हेगारीविषयी जनजागृती करणार आहेत. नुकतेच या ऑनलाईन वेबिनार कार्यशाळेचे उद्घाटन मंत्री ॲड. ठाकूर यांच्या हस्ते झाले. यावेळी पोलीस सहआयुक्त (गुन्हे) मिलिंद भारंबे, सायबर गुन्हे शाखेच्या उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर आदी उपस्थित होते. सध्याचे युग हे डिजिटल युग आहे.  दिवसेंदिवस सगळ्याच क्षेत्रातील तंत्रज्ञानामध्ये प्रगती होत आहे.  परंतु, तंत्रज्ञानाच्या योग्य वापराचे जसे फायदे आहेत त्याचप्रमाणे गैरवापरही वाढला आहे. आणि याच गोष्टीचा फायदा गुन्हेगार घेत आहेत. इंटरनेटचा वापर वेगाने वाढत असतानाच सायबर गुन्हे करण्याच्या प्रमाणातही दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे

हेही वाचाः- मुंबईतल्या सर्व दुकानात सीसीटिव्ही कॅमेरे लावणं सक्तीचं

फेसबुक, इन्स्टाग्राम आदी सोशल मिडीया अकाऊंटच्या माध्यमातून आपण मित्र- मैत्रिणी, नातेवाईक तसेच विविध माध्यमातून ओळखी झालेल्या लोकांच्या संपर्कात राहत असतो.  काही वेळेस फक्त एखादी व्यक्ती आपल्या सोशल मिडीयावरील फ्रेंडलिस्टमध्ये आहे किंवा चांगल्या स्वभावाची वाटत आहे म्हणून कोणतीही सावधगिरी न बाळगता त्या व्यक्तीच्याही संपर्कात येतो. बहुदा अशा प्रकारे महिलांसंदर्भात घडणाऱ्या सायबर गुन्ह्यांची सुरुवात होत असते. त्यामुळे तंत्रज्ञान शिकत असताना, त्याचा वापर करत असताना आपल्या खाजगी व व्यक्तीगत जीवनाविषयी कोणत्या व्यक्तीला किती माहिती द्यावी व सतर्क राहून सायबर गुन्हेगारांच्या जाळयात अडकण्यापासून स्वत:ला कसे वाचवावे याबाबत महिलांनी अधिक जागरुक राहणे आवश्यक आहे, असेही ठाकूर म्हणाल्या.यावेळी वेबिनारच्या माध्यमातून सहभागी महिला, पालकांना विवाहविषयक संकेतस्थळावर नोंदणी करताना तसेच त्यानंतर घ्यायची काळजी याअनुषंगाने सायबर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. या चर्चेत विविध मॅट्रिमोनिअल संकेतस्थळांच्या प्रतिनिधींनीही सहभाग घेतला.

फसवणुकीचे प्रकार

१. जेव्हा अशा प्रोफाईल बनविल्या जातात तेव्हा काही दिवसातच तुम्हाला प्रोफाईल मॅच झाल्याचे नोटिफिकेशन येते ,यात बऱ्याचदा मॅच झालेली प्रोफाईल ही कोणत्यातरी परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकाची असते . (आपल्याकडे परदेशात राहणाऱ्या भारतीयांबद्दल विशेषतः उपवर मुलींच्या पालकांच्या मनात सुप्त आकर्षण असते त्यामुळे सायबर भामटे मुख्यतः अशाच प्रोफाईल चा आधार घेतात) हळूहळू संवाद वाढतात ,ओळख वाढते व समोरील व्यक्ती कालांतराने आपल्या बोलण्याने मोहित करते .ते कधी ऑनलाईन बोलतात फार आग्रह केला तरच कॅमेरावर व्हिडिओ कॉल होतो . मग एके दिवशी ती व्यक्ती तुम्हाला सांगते की ते परदेशातून तुम्हाला काही महागडी भेट वस्तू पाठवत आहे.नंतर फोन येतो की, तुमच्या नावाने एक पार्सल आले आहे व कस्टम क्लिअरन्सकरिता अडकले आहे त्यामुळे एका ठराविक अकाउंट मध्ये ऑनलाईन ठराविक रक्कम भरावी की २ दिवसात तुमचे पार्सल तुम्हास मिळेल . पैसे अकाउंटमध्ये भरले तरी पार्सल येत नाही. तो नंबरपण बंद होतो व तसेच तुम्ही ज्या प्रोफाईलवरील व्यक्तीशी बोलणे चालू होते ती प्रोफाईल व सोशल मिडिया अकाउंट अचानक डिअ‍ॅक्टिवेट (deactivate) होते .

२. या प्रकारात वरील प्रमाणेच ओळख होते व दोन्ही बाजूला संभाषण सुरु होते. संभाषणात एकमेकांबद्दल जवळीक निर्माण होऊन अनेक वैयक्तिक व खाजगी फोटोज व माहिती शेअर केली जाते . हळूहळू समोरची व्यक्ती मग तुम्हाला ब्लॅकमेल (blackmail) करण्यास सुरुवात करते. ठराविक रक्कम तुम्ही न दिल्यास तुमचे फोटोज व माहिती सोशल मीडियावर प्रसारित केली जाईल .

३. या प्रकारात मुख्यतः फसवली जाणारी व्यक्ती या एकतर घटस्फोटित ,किंवा ज्यांच्या जोडीदाराचे निधन झालेले आहेत. किंवा ज्यांची लग्न काही कारणाने होऊ शकले नाहीत अशा व्यक्ती असतात त्यातपण महिलांची संख्या अधिक आहे. संभाषण सुरु झाल्यावर समोरील व्यक्ती कधी तुम्हाला महागडी भेट वस्तू अडकली आहे या कारणाने ,तर कधी आपण आर्थिक विवंचनेत आहोत असे भासवून काही रक्कम घेते व नंतर गायब होते.

मॅट्रिमोनिअल साईट्स वर नोंदणी करताना त्या माध्यमातून आलेले विवाह प्रस्ताव अतिशय पारखून घ्यावेत; संबधित व्यक्तीच्या कोणत्याही आमीषाला बळी पडू नये.खाजगी व व्यक्तीगत जीवनाविषयी कोणत्या व्यक्तीला माहिती देऊ नये. अनेकदा फसवणूक करणारे परदेशात चांगल्या हुद्यावर कामाला आहेत असे भासवून, पैसे अडकले असल्याचे सांगून किंवा  भेट वस्तू पाठवल्याचे सांगून ते विमानतळावर कस्टमअधिकाऱ्यांकडे पैसे भरून स्विकारण्यास सांगतात तर बहुतांश गुन्ह्यात मुलींचे फोटो माँर्फ करून त्यांना ब्लॅकमेल करून पैसे उकळले जातात. असे प्रोफाइल पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यावेत.

डाॅ रश्मी करंदीकर, पोलिस उपायुक्त, मुंबई सायबर विभाग

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा