निर्माता प्रेरणा अरोराविरोधात आरोपपत्र दाखल

प्रसिद्ध निर्माती प्रेरणा अरोराविरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात १७६ पानांचं आरोपपत्र सोमवारी दाखल केलं.

निर्माता प्रेरणा अरोराविरोधात आरोपपत्र दाखल
SHARES

प्रसिद्ध निर्माती प्रेरणा अरोराविरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात १७६ पानांचं आरोपपत्र सोमवारी दाखल केलं. केदारनाथ, पॅडमॅन या चित्रपटांसाठी अरोरा यांनी वासू भगनानीसह इतर दोन जणांकडून पैसे स्विकारत भगनानी यांची ३१ कोटी रुपयांची फसवणूक केली होती. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने निर्माता प्रेरणा अरोराला मागील वर्षी अटक केली होती. मात्र या प्रकरणात तिची आई प्रतिमा अरोरा ही अद्याप फरार असून पोलिस तिच्या शोधात आहेत.


वासू भगनानींकडून कर्ज

२०१६ ते १८ या वर्षात प्रेरणाची आई प्रतिमा अरोरा हिच्या नावाने असलेल्या ‘क्रीआर्ज इंटरटेन्मेन्ट’ द्वारे केदारनाथ, पॅडमॅन, टाॅयलेट एक प्रेम कथा, रूस्तम, परी हे बिग बजेट सिनेमे प्रेक्षकांसमोर आणले. मात्र, यातील केदारनाथ आणि पॅडमॅन या सिनेमासाठी तिने वासू भगनानी यांच्यासह इतर दोन जणांकडून पैसे घेतले होते. दोन्ही सिनेमांनी चांगली कमाई केली. मात्र, केदारनाथ या सिनेमाचे हक्क प्रेरणाकडे नसताना तिने भगनानी यांच्याकडून पैसे घेतले होते. त्याचबरोबर पाली हिल येथे घर घेण्यासाठीही भगनानी यांच्याकडून ९ कोटी रुपये घेतले होते.


पैसे देण्यास टाळाटाळ

वस्तुस्थिती कळाल्यानंतर भगनानी यांनी प्रेरणाकडे पैसे मागण्यास सुरूवात केली. मात्र प्रेरणाने पैसे देण्यास टाळाटाळ केल्यामुळे भगनानी यांच्यावतीने पुजा फिल्म कंपनीचे व्यवस्थापक नागेश वैदीकर यांच्यासह तर दोन कंपन्यांनी १४ जुलै २०१८ मध्ये प्रेरणाविरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडं तक्रार नोंदवली.


अाईचाही सहभाग

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त पराग मणेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय गोविलकर यांनी प्रेरणा विरोधात ४२०, १२० (ब) भा.द.वि कलमांतर्गत गुन्हा नोंदवला. या गुन्ह्यांत निमीत उर्फ अर्जून कपूरसह अरोराची आई प्रतिमा अरोरा (७१) हिचाही सहभाग आढळल्यानंतर पोलिसांनी तिच्या विरोधात गुन्हा नोंदवला. या गुन्ह्यात पोलिसांनी प्रेरणाला ७ डिसेंबर २०१८ रोजी अटक केली. प्रेरणाला भायखळा महिला कारागृहात ठेवण्यात आलं आहे. मात्र प्रेरणाची आई प्रतिमा आणि निमित हे अद्याप पोलिसांच्या हाती लागले नसून पोलिस त्यांच्या मागावर असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं.


२५ साक्षीदार

या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत २५ साक्षीदारांची साक्ष नोंदवली असून त्यात दोघांची साक्ष ही सीआरपीसी १६४ अंतर्गत नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणी सोमवारी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात १७६ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने “मुंबई लाइव्ह”ला दिली आहे.


हेही वाचा -

विनयभंगाच्या गुन्ह्यातून गायक अभिजीत भट्टाचार्य निर्दोष

पोलिस आयुक्तांनी घेतली शिपायाच्या कामगिरीची दखल



Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा