अंधश्रद्धेतूनच त्याने केली ३ वर्षाच्या मुलीची हत्या

एका महिलेने त्याला त्याच्यावर कुणीतरी काळी जादू केल्याचे सांगितले. यातून मुक्त होण्यासाठी तिने त्याला जुळ्या मुलींची हत्या करण्यास सांगितली होत

अंधश्रद्धेतूनच त्याने केली ३ वर्षाच्या मुलीची हत्या
SHARES
मुंबईच्या कुलाबा येथील उच्चभ्रू वस्तीत ३ वर्षीय मुलीला इमारतीच्या सातव्या मजल्यावरून फेकून तिची हत्या केली होती. या हत्येचं खळबळजनक कारण समोर आलं आहे. अंधश्रद्धेला  बळी पडून मुलीची हत्या झाल्याचं पोलिस तपासात निष्पन्न झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी अनिल चुगानी (४५) याला अटक केली आहे.  या प्रकरणी न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.

नेमकं काय घडलं?

कुलाबामधील रेडिओ क्लबजवळच्या अशोका टॉवर इमारतीत मृत ३ वर्षांची मुलगी आपल्या कुटुंबियांसोबत राहत होती. या मुलीचे वडील प्रेमलाल हतिरामानी यांचा अनिल हा लहानपणापासून जवळचा मित्र होता. अनिल हा सहा महिन्यापूर्वी आफ्रीकेच्या मोरोक्को येथून भारतात स्थायिक झाला होता. मात्र त्याला भारतात कुठेही नोकरी मिळत नव्हती. त्यामुळे तो नैराश्येत होता. त्यातच पत्नीला दिवस गेल्यामुळे त्याने तिला माहेरी पाठवलं होतं. त्यामुळेच वेळ घालवण्यासाठी अनिल हा प्रेमलालच्या घरी जायचा. प्रेमलालच्या दोन्ही जुळ्या मुलींसोबत तो वेळ घालवायचा. मात्र त्यामागे त्याचा हेतू काही वेगळाच होता. शनिवारी अनिलने मुलींना स्वत:च्या घरी खेळण्यासाठी नेले होते. अनिल ओळखीचा आणि जवळचा असल्यामुळे मुलींना घरातल्यांनी त्याच्यासोबत सोडलं होतॆ. मुली घरी खेळत असताना घरात अनिलकडे काम करणारी त्याची मोलकरीन स्वयंपाक घरात काम करत होती. सायंकाळी ७ च्या सुमारास अनिलने एका मुलीला हात धुवायच्या निमित्ताने बेडरूममध्ये नेत तिला खिडकीतून खाली फेकले.

स्वतःच पोलिसांना दिली माहिती

मुलगी खाली पडल्याने मोठा आवाज झाला.  अनिलच्या घरातील मोलकरणीला मुलगी खाली पडल्याचं कळालं. त्यावेळी तिने अनिलच्या बेडरूमजवळ धाव घेतली. मात्र अनिलने बेडरूमच्या दरवाजाला आतून कडी लावली होती. परिसरातील नागरिकांनी तिला सेंट जाॅर्ज रुग्णालयात नेले. मुलीला फेकल्याची माहिती स्वत: अनिलने नियंत्रण कक्षाला दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अनिलला ताब्यात घेतलं. त्याच्यावर हत्येचा गुन्हा नोंदवत त्याला अटक केली. मित्राने मुलीची हत्या केल्याचं कळाल्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतली.

महिलेचा शोध सुरू

अनिल हा नोकरीच्या शोधात होता. त्याचबरोबर मागील अनेक दिवसांपासून त्याला शारीरिक वेदनाही होत होत्या. त्याच वेळी एका महिलेने त्याला त्याच्यावर कुणीतरी काळी जादू केल्याचं सांगितलं. यातून मुक्त  होण्यासाठी तिने त्याला जुळ्या मुलींची हत्या करण्यास सांगितली होती. त्यातूनच त्याने हे पाऊल उचलल्याचं तपासात पुढं आलं होतं. सुदैवाने दुसरी मुलगी अनिलच्या मोलकरणीकडे असल्यामुळे वाचली. अन्यथा अनिल तिचीही हत्या करणार होता. रविवारी अनिलच्या घराची झडती घेतली. त्यावेळी काळ्या जादूबाबतची काही कागदपत्रेही पोलिसांना अनिलच्या घरात आढळली. त्यातील एका कागदावर (kill to twins) असा मजकूर लिहिला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. पोलिस आता अनिलला काळ्या जादूचा सल्ला देणाऱ्या महिलेचा शोध घेत आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय