रेल्वेत नोकरीच्या नावाखाली ७ तरुणांना ३० लाखांचा गंडा

पैसे देऊन कित्येक महिने उलटल्यानंतरही काम होत नसल्यामुळे राहुलवर तरुणाने संशय घेतला. खात्री करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रेल्वे कार्यालयात चौकशी केली. त्या ठिकाणी अशी कोणतीही भरती किंवा रेल्वेचे संकेतस्थळ नसल्याचं त्याला समजलं.

SHARE

मुंबईत सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या ७ तरुणांना ३० लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना समोर आली आहे.  या तरुणांची खात्री पटावी यासाठी आरोपींनी तरुणांची एका सरकारी रुग्णालयात वैद्यकीय तपासणीही केली. मात्र, कालांतराने हा सर्व प्रकार बनाव असल्याचं लक्षात आल्यानंतर तरुणांनी आग्रीपाडा पोलिस ठाण्यात तिघांविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणात एका रेल्वेच्या अधिकाऱ्याचा समावेश असल्याचं सांगण्यात येतं. 


कर्ज काढून पैसे भरले

कल्याणमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने नुकतीच अभियांत्रिकी पदवी घेतली आहे.  सरकारी नोकरी मिळाल्यास भविष्याची चिंता मिटेल यामुळे अभियांत्रिकी पदवी असलेला कल्याणमधील एक तरूण सरकारी नोकरीच्या शोधात होता. त्याची ओळख राहुल कोकरे या ठगाशी झाली. आपण पुणे येथे रेल्वेत नोकरीला असून, कनिष्ठ अभियंता पदासाठी भरती सुरू आहे. या नोकरीसाठी २५ लाख रुपये खर्च येईल, असं राहुलने या तरूणाला सांगितलं. कायमस्वरूपी नोकरी मिळत असल्याने कर्ज काढून तो पैसे भरण्यास तयार झाला. 


कोलकातात वैद्यकीय तपासणी 

त्याने व्हॉट्सअॅपवरून आपली माहिती आणि कागदपत्रे राहुलला पाठवली. रेल्वेच्या संकेतस्थळावर नोंदणी करण्यासाठी तसंच इतर प्रक्रियेसाठी राहुलने त्याच्या अन्य साथीदाराचा मोबाइल क्रमांक दिला. हा तरुण राहुल आणि त्याच्या अन्य दोन साथादारांच्या संपर्कात होता. कोलकाता येथील विभागात नोंदणी झाल्याचे या तरुणाने वेबसाइटवर पाहिले. यानंतर वारंवार वेगवेगळी कारणे सांगून त्याच्याकडून तिघांनी १० लाख रुपये उकळले. तरुणाला संशय येऊ नये यासाठी वैद्यकीय तपासणीचा बनाव करण्यात आला. या तरुणाला कोलकाता येथील बी. आर. सिंग रुग्णालयात नेऊन त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर त्याला फिटनेस सर्टिफिकेटही देण्यात आले.


रेल्वे कार्यालयात चौकशी

 पैसे देऊन कित्येक महिने उलटल्यानंतरही काम होत नसल्यामुळे राहुलवर तरुणाने संशय घेतला. खात्री करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रेल्वे कार्यालयात चौकशी केली. त्या ठिकाणी अशी कोणतीही भरती किंवा रेल्वेचे संकेतस्थळ नसल्याचं त्याला समजलं. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या तरुणाने आग्रीपाडा पोलिस ठाण्यात तक्रार केली. यावेळी या तरुणाप्रमाणे आणखी सहा जणांना अशाप्रकारे फसवण्यात आले असून, त्यांनीही तक्रार केल्याचं समजलं. सर्व तरूणांच्या फसवणुकीचा आकडा ३० लाख रुपयांवर गेला आहे. हेही वाचा -

परदेशी बँकेच्या फसवणुकीप्रकरणी कुरिअर कंपनीवर गुन्हा

अंमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी २ नायजेरियनला अटक
संबंधित विषय
ताज्या बातम्या