कर्नाटक एसआयटी अधिकारी मुंबईत


कर्नाटक एसआयटी अधिकारी मुंबईत
SHARES

नालासोपारातील स्फोटकांच्या चौकशीतून उघडकीस आलेल्या डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचे धागेदोरे कर्नाटकातील कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येशी संबधित असल्याच्या संशयावरून शनिवारी कर्नाटकचे एसआयटी पथक मुंबईला आले होते. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांंच्या हत्येची माहिती कर्नाटक एसआयटीने एटीएसच्या अधिकाऱ्यांना दिली. त्याचबरोबर नालासोपारा येथील स्फोटकांची माहिती घेत पाचही आरोपींकडे सुमारे पाऊण तास चौकशी केली. या चौकशीदरम्यान एटीएसच्या एका अधिकाऱ्याने भाषेचा अडथळा येऊ नये. यासाठी मदत केल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.

नालासोपारा स्फोटका प्रकरणी पोलिसांनी रविवारी घाटकोपरच्या भटवाडी परिसरातून अविनाश पवार याला अटक केली. या ना त्या कारणातून अविनाश अटक केलेल्या सर्व आरोपींच्या संपर्कात होता. ही स्फोटकं बनवण्यातही त्याचा सहभाग निश्चित झाल्यानंतरच एटीएसने कारवाई केली.


आरोपींकडे केली चौकशी

अविनाशच्या अटकेनंतर कर्नाटकात लेखक एम. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणात महाराष्ट्र एटीएसने नालासोपारा स्फोटक प्रकरणात नुकतेच अटक केलेल्या आरोपींचा हात असल्याचा संशय कर्नाटकच्या एसआयटीने व्यक्त केला होता. त्यानुसार कर्नाटक एसआयटीने स्फोटकातील आरोपी आणि गुन्ह्यांची माहिती महाराष्ट्र एटीएसकडे मागितली होती. 

महाराष्ट्र एटीएसने देखील कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणाशी अटकेत असलेल्या आरोपींचा संबध निश्चित करायचा होता. त्या दृष्टीकोनातून शनिवारी कर्नाटक एसआयटीचे पथक मुंबईत आले होते. रविवारी दिवसभर महाराष्ट्र एटीएसच्या अधिकाऱ्यांबरोबर माहितीची देवाण घेवाण करून एसआयटी पथकाने स्फोटकातील आरोपींकडेही पाऊण तास चौकशी केली. त्यावेळी भाषेचा व्यत्यय येऊ नये. त्या अनुषंगाने महाराष्ट्र एटीएसचे अधिकारी चौकशीदरम्यान उपस्थित होते.


सनातनच्या आश्रमात वावर

या चौकशी दरम्यान नुकताच अटक केलेला आरोपी अविनाश पवार याचा सनातनच्या अनेक कार्यक्रमास सहभागी असल्याची माहिती मिळाली. त्याचबरोबर त्याचे गोवा आणि पनवेल येथील सनातनच्या आश्रमात वावर होता. सनातनसह अन्य हिंदुत्ववादी संघटनांच्या अनेक कार्यक्रमाला अविनाशने उपस्थिती दाखवल्याची माहिती पुढे आली आहे.


अविनाशच्या घराची झडती

एटीएसच्या अधिकाऱ्यांनी अविनाशच्या घराची झडती घेतली असता घराच्या कपाटात २० एप्रिल रोजी प्रकाशित झालेल्या ‘सनातन प्रभात’ या वृत्तपत्राचा अंक होता. या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार ‘हिंदुत्वनिष्ठ’ अविनाश पवारसह अन्य ‘धर्म व राष्ट्रप्रेमी’ १५ एप्रिलला सनातनच्या पनवेल येथील आश्रमात उपस्थित असल्याचं म्हटलं आहे.

हिंदू एकता जागृती समितीचे सुभाष अहिर, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे दिनेश आव्हाड आणि अविनाश पवार यांनी एकत्र येत ‘श्री शिवछत्रपती स्वराज्य’ या संकेतस्थळाची निर्मिती केली होती. हे संकेतस्थळ म्हणजे स्वदेशी वस्तूंची ऑनलाइन बाजारपेठ. या संकेतस्थळाचं उद्घाटन सनातनच्या पनवेल आश्रमात रमेश गडकरी यांच्या हस्ते करण्यात आल्याची माहिती या वृत्तात देण्यात आली होती.


पोलिस तपास सुरू

घाटकोपरच्या भटवाडीत अविनाश आपल्या आईसोबत रहात होता. वडील अनंत यांच्या निधननंतर माझगाव डॉक येथील वडिलांच्या नोकरीच्या जागी अविनाश अनुकंपतत्वावर कामाला राहिला. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा