वाहतूक कोंडी आणि टोल वाचवण्यासाठी बनला तोतया कस्टम अधिकारी


वाहतूक कोंडी आणि टोल वाचवण्यासाठी बनला तोतया कस्टम अधिकारी
SHARES

मुंबईच्या वाढत्या वाहनांच्या गर्दीत आणि टोल वाचवण्यासाठी गाडीला अंबर दिवा लावून फिरणाऱ्या बनावट कस्टम अधिकाऱ्याला माहिम पोलिसांनी अटक केली आहे. अमरजितसिंग रघुवंशी (४१) असं या तोतया कस्टम अधिकाऱ्याचं नाव आहे. पोलिसांनी त्याच्याजवळून बनावट कस्टमचं ओळखपत्रही हस्तगत केलं आहे. 


बनावट कस्टम अधिकाऱ्याची करामत

मुंबईत मेट्रो आणि मोनोमुळे शहरातील विविध रस्त्यांवर खोदकाम करण्यात आल्यामुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. मात्र या समस्यांपासून वाचण्यासाठी अमरजित सिंगनं गाडीवर अंबर दिवा लावला आहे. अमरसिंग वाहतूक कोंडीत अडकला की गाडीवरील अंबर दिवा वाजवून वाट काढायचा.

मंगळवारी सकाळी माहीम परिसरात नेहमीप्रमाणे वाहतूक कोंडीतून वाट काढण्यासाठी अमरजित सिंग हा सायरन वाजवून जात असल्याचं माहीम पोलिसांच्या निदर्शनास आलं. त्यावेळी धारावी पोलिस ठाण्यातील पोलिस त्याठिकाणी वाहतूक नियंत्रणात आणत होते. अमरजित सिंगला पोलिसांनी थांबण्याचा इशारा करूनही तो न थांबल्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आला. 

पाठलागकरून तोतया अधिकाऱ्याला पकडले

त्यानंतर पोलिसांनी त्याच्या गाडीचा पाठलाग सुरू केला. एक किलोमीटर अंतरावर अमरजितची गाडी माहीम कॉजवे परिसरात आल्यानंतर पोलिसांनी त्याची गाडी अडवली. त्यावेळी अमरजितनं तो कस्टम अधिकारी असल्याचं सांगून तिकडून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र एकंदरीत पोलिसांना त्याच्या हालचाली आणि गाडीपाहून संशय आल्यानं अमरजितकडे चौकशी करण्यास सुरूवात केली. अधिक चौकशीत अमरजित खोटं बोलत असल्यानं पोलिसांनी त्याच्याजवळ ओळखपत्राची मागणी केली.

गाडीवर अंबर आणि बनावट ओळखपत्र 

अमरजितनं कस्टमचे त्याच्या नावानं बनवलेलं बनावट ओळखपत्र पुढे केलं. ओळखपत्र बनावट असल्याचं निदर्शनास येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. अधिक चौकशीसाठी धारावी पोलिसांनी अमरजितला माहीम पोलीस ठाण्यात आणलं. चौकशीत अमरजितनं गुन्ह्याची कबूली दिली.

व्यवसायानं कॉन्ट्रॅक्टर असलेल्या अमरजितनं मुंबईतल्या वाहतूक कोंडी आणि टोलवर पैसे न देण्यासाठी गाडीवर अंबर दिवा आणि खोटं ओळखपत्र बनवल्याची कबूली दिली. याप्रकरणी अमरजितवर माहीम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.



हेही वाचा

80 हजारांची लाच घेताना पोलिस निरीक्षकाला अटक

४ वर्षाच्या मुलाला गळफास देऊन आईचीही आत्महत्या



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा