डाॅ. पायल आत्महत्या: तिन्ही आरोपी डाॅक्टरांचं निलंबन

डॉ. पायल तडवी हिचं रॅगिंग करून तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या नायर रुग्णालयातील ३ कनिष्ठ डॉक्टरांचं सदस्यत्व ‘महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडंट डॉक्टर्स’ (मार्ड) ने रद्द केलं आहे.

डाॅ. पायल आत्महत्या: तिन्ही आरोपी डाॅक्टरांचं निलंबन
SHARES

डॉ. पायल तडवी हिचं रॅगिंग करून तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या नायर रुग्णालयातील ३ कनिष्ठ डॉक्टरांचं सदस्यत्व ‘महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडंट डॉक्टर्स’ (मार्ड) ने रद्द केलं आहे. सोबतच राज्य महिला आयोगाने रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. रमेश भारमल यांना नोटीस बजावून अहवाल मागितला आहे. दरम्यान तिन्ही आरोपी डाॅक्टरांनी ‘मार्ड’ला पत्र पाठवून कारवाई करण्याआधी आमची बाजू मांडण्याची संधी मिळावी, अशी मागणी केली आहे.

विभाग प्रमुखांना निलंबित करा

डाॅ. पायल तडवीने वरिष्ठ सहकाऱ्यांकडून होत असलेल्या त्रासाबद्दल तोंडी व लेखी तक्रार करूनही संबंधितांवर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे पायलला आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलावं लागलं. त्यामुळे संबंधित विभागाच्या प्रमुखांना निलंबित करावं, अशी मागणीही ‘मार्ड’ने केली आहे.

अधिष्ठातांना नोटीस

सोबतच राज्य महिला आयोगाने नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. भारमल यांना नोटीस पाठवत आपल्या रुग्णालयात व त्याच्याशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमध्ये रॅगिंगविरोधी कायद्याची अंमलबजावणी होते का?, असा प्रश्न विचारला आहे. पायलच्या आत्महत्येमुळे विद्यार्थी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सुसंवाद नसल्याचं स्पष्ट झालं असून यासंदर्भात सखोल चौकशी करून त्याचा सविस्तर अहवाल येत्या ८ दिवसांत राज्य महिला आयोगाकडे सादर करावा. तसंच रॅगिंगविरोधी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी कोणती पावले उचलणार आहात हे देखील स्पष्ट करावं, असं विचारण्यात आलं आहे. 


गुन्हा दाखल

डॉक्टरांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर या तिन्ही डॉक्टर पायलला तिच्या जातीवरून हिणवायचे. सहकारी डाॅक्टरांच्या रॅगिंगला कंटाळून डाॅ. पायलने २२ मे रोजी आत्महत्या केली होती, असा आरोप पायलच्या कुटुंबीयांनी केला आहे. या आत्महत्येप्रकरणी डॉ. हेमा आहुजा, भक्ती मेहर आणि अंकिता खंडेलवाल या तिघींविरुद्ध आग्रीपाडा पोलीस ठाण्यात २३ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्येस प्रवृत्त करणं, रॅगिंग तसंच अट्रॉसिटी कायद्याखाली हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

डॉ. पायलच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याच्या मागणीसाठी  एसएफआय, डीवायएफआय, जनवादी महिला संघटना, जातीअंत संघर्ष समितीच्या माध्यमातून रुग्णालयाबाहेर निदर्शने देखील करण्यात आली. 



हेही वाचा-

अनुराग कश्यपच्या मुलीबाबत सोशल मीडियावर अश्लील कमेंट, ओशिवरा पोलिसात गुन्हा

संपत्तीच्या वादातून गोवंडीत गोळीबार, दोन जखमी



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा