अखेर परमबीर सिंह यांची बदली, हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त

मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना भोवली असून त्यांची तडकाफडकी बदली करण्याचा निर्णय राज्य सरकारने बुधवारी घेतला.

अखेर परमबीर सिंह यांची बदली, हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त
SHARES

अँटिलिया स्फोटक प्रकरणानंतर मनसुख हिरेन यांचा झालेला संशयास्पद मृत्यू आणि या साऱ्या प्रकरणात मुंबई पोलीस (mumbai police) दलातील सहाय्यक निरिक्षक सचिन वाझे यांना झालेली अटक अखेर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना भोवली असून त्यांची तडकाफडकी बदली करण्याचा निर्णय राज्य सरकारने बुधवारी घेतला. 

परमबीर सिंग यांची गृहरक्षक दलामध्ये बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर हेमंत नगराळे यांची मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांनी ही माहिती दिली आहे. हेमंत नगराळे हे १९८७च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून त्यांनी याआधी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त, तसंच महाराष्ट्राच्या महासंचालकपदाची (विधी आणि तंत्रज्ञान) जबाबदारी देखील सांभाळलेली आहे. हेमंत नगराळे यांच्याकडे १ वर्षे ७ महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे.

हेही वाचा- सचिन वाझेंच्या गाडीत नोटा मोजण्याचं मशीन, ५ लाखही सापडले

सचिन वाझे यांच्या अटकेनंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून रोज नवनवीन खुलासे समोर येत असल्याने विरोधक भाजपकडून देखील दबाव वाढला होता. सचिन वाझे हे थेट आयुक्त परमबीर सिंग यांना रिपोर्ट करत असल्याने परमबीर सिंग यांचंही निलंबन करण्याची मागणी भाजप नेत्यांकडून केली जात होती. अखेर गृह विभागाने त्यांच्या बदलीचे आदेश काढत या प्रकरणाची जबाबदारी निश्चित करण्याचा प्रयत्न केला आहे.

मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदलीसोबतच इतर विभागातील अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार रजनीश शेठ यांच्याकडे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे, तर संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जवाबदारी सोपवण्यात आली आहे. 

नवी मुंबईचे पोलीस आयुक्त असताना वाशी येथील बँक ऑफ बडोदा या बँकेवरील दरोड्याची उकल अवघ्या दोन दिवसात केल्याने नगराळे यांचं कौतुक झालं होतं. तर विधानपरिषदेची परवानगी न घेताच शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात त्यांनी गुन्हा दाखल केल्याप्रकरणी त्यांना निलंबितही करण्यात आलं होतं.

नगराळे यांचा आतापर्यंत राष्ट्रपती पोलीस पदक, विशेष सेवा पदक आणि आंतरिक सुरक्षा पदकाने गौरव करण्यात आला आहे.

हेही वाचा- सचिन वाझे प्रकरणावरून अमृता फडणवीस यांची ठाकरे सरकारवर टीका

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा