छगन भुजबळांचा जामीन अर्ज असंवैधानिक: ईडी


छगन भुजबळांचा जामीन अर्ज असंवैधानिक: ईडी
SHARES

सर्वोच्च न्यायालयाने 'प्रिव्हेन्शन आॅफ मनी लाँड्रिंग अॅक्ट', २००२ मधील कलम ४५ (१) रद्द ठरवल्यानंतर गेल्या २ वर्षांपासून तुरूंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी जामिनासाठी 'पीएमएलए' न्यायालयात धाव घेतली आहे. मंगळवारी त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरु झाली. मात्र भुजबळांचा जामीन अर्ज असंवैधानिक असल्याचा दावा अंमलबजावणी संचालनालया (ईडी)च्या वकिलांनी न्यायालयात केला. गुरुवारी या प्रकरणाची पुन्हा सुनावणी ठेवण्यात आली आहे.


सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं काय?

'पीएमएलए'मधील कलम ४५ (१) सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवल्यानंतर या कायद्यान्वये ज्या आरोपींनी यापूर्वी जामिनासाठी अर्ज केला असेल अथवा तो फेटाळला असेल असे आरोपी पुन्हा 'पीएमएलए' न्यायालयात या तरतुदीच्या विरोधात जामिनासाठी अर्ज करू शकतात, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.


भुजबळांच्या आशा पल्लवीत

त्या कायद्यान्वये गेल्या दीड ते पावणे दोन वर्षांपासून तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या जामिनाच्या आशा पल्लवीत झाल्या. मंगळवारी मुंबई 'पीएमएलए' न्यायालयात न्यायमूर्ती एम. एस. आझमी यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत भुजबळांच्या वकिलांनी कलम ४५ (१) रद्द करण्यात आल्याने त्यांना जामीन देण्याची मागणी केली. मात्र या मागणीचा 'ईडी'च्या वकिलांनी जोरदार विरोध केला.

'ईडी'च्या वतीने अॅड. एच. वेणेगावकर यांनी बाजू मांडताना सांगितलं की, सर्वोच्च न्यायालयाने कलम ४५ (१) रद्दबातल ठरविलं असले तरी त्यांनी सुचविलेल्या तरतुदींमध्ये भुजबळांचा जामीन अर्ज असंवैधानिक ठरतो. तसेच बेहिशोबी मालमत्ता जप्त करण्यात आल्याने त्यांच्या गुन्ह्याची तीव्रता कमी होत नाही, असं स्पष्ट करत त्यांनी भुजबळांच्या जामीन अर्जाला विरोध केला.


शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे उपस्थित

या सुनावणीदरम्यान शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे हे सुद्धा उपस्थित होते. प्रकाश सुर्वे बराच वेळ छगन भुजबळ यांच्या शेजारी बसून होते. सुर्वे शिवसेनेत प्रवेश करण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यावेळी ते छगन भुजबळांच्या निकटवर्तीयांपैकी एक होते. भुजबळांचे कट्टर समर्थक अशीही सुर्वेंची ओळख होती. मात्र विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि मुंबईतील मागाठाणे मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडूनही आले.


भुजबळांचं कुटुंबीयही उपस्थित

आजच्या सुनावणीसाठी संपूर्ण भुजबळ कुटुंबिय 'पीएमएलए' कोर्टात हजर होते. पत्नी मीना भुजबळ, मुलगा पंकज, दोन्ही सुना विशाखा आणि शेफालीसह भुजबळांची नातवंडही कोर्टरुमध्ये भुजबळांच्या आजूबाजूला बसली होती.हेही वाचा-

भुजबळांना पुन्हा करायचंय मतदान!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा