पवईत विद्यार्थिनीला पाहून अश्लील चाळे

  Powai
  पवईत विद्यार्थिनीला पाहून अश्लील चाळे
  मुंबई  -  

  रेल्वेमध्ये महिलांकडे पाहून अश्लील चाळे करण्याच्या दोन घटना ताज्या असतानाच पवईत देखील असाच प्रकार समोर आला आहे.

  दुचाकीवरून आलेल्या एका विकृत तरूणाने कॉलेजमधून परतणाऱ्या चार विद्यार्थिनींना गाठून त्यांच्यापुढे अश्लील चाळे केल्याचा प्रकार गुरुवारी घडला आहे. याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात अज्ञात तरुणाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


  काॅलेजमधून घराकडे जाण्यासाठी निघालेल्या चार विद्यार्थिनी पवई हिरानंदानी येथून चालत होत्या. तेवढ्यात गलेरिया माॅलजवळ इटेर्निया बिल्डिंगच्या समोर एक निळ्या रंगाची मोटरसायकल येऊन थांबली. या मोटसायकलवर बसलेल्या विकृत तरूणाने 19 वर्षीय तक्रारदार आणि तिच्या मैत्रीणींसमोर अश्लील कृत्य केले.


  पोलीस कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा?

  या प्रकारामुळे घाबरलेल्या विद्यार्थिनींनी त्वरीत 100 क्रमांकावर मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला फोन केला. मात्र घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी विद्यार्थिनींकडून माहिती घेण्याचे सोडून 'तुम्ही घरी जा, आम्ही बघतो', असे म्हणून त्यांना तेथून पळवून लावले.

  त्यानंतर हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मात्र पोलिसांची एकच तारांबळ उडाली. सीएसटीवरील घटनेत जीआरपीवर जशी कर्मचाऱ्याला निलंबित करण्याची नामुश्की ओढावली ती वेळ आपल्यावर येऊ नये, म्हणून पोलीस तात्काळ कार्यरत झाले आणि त्यांनी महिला पोलिसांचे एक पथक तक्रारदार विद्यार्थिनींच्या घरी पाठवून तक्रार नोंदवून घेतली.

  पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे. घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले असल्याने या विकृत तरूणाचा छडा लागण्यास मदत होऊ शकते. तसेच पोलिसांनी विद्यार्थिनींना सहकार्य न केल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावरही कारवाई होऊ शकते, असे म्हटले जात आहे.


  पवईच्या घटनेत तक्रारदाराने कंट्रोल रुमला फोन लावला. पण तक्रारदार आणि फोनला प्रतिसाद देणाऱ्यामध्ये थोडाफार गोंधळ झाला. मात्र त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार त्वरीत महिला पोलिसांचे एक पथक तक्रारदाराच्या घरी पाठवण्यात आले. तेथे तक्रारदाराच्या तक्रारीची नोंद करून तपासाला सुरूवात करण्यात आली आहे. या घटनेत पोलीस कर्मचारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
  रश्मी करंदीकर, प्रवक्त्या, मुंबई पोलीस  हे देखील वाचा -

  लोकलमध्ये अश्लिल चाळे करणाऱ्या विकृताविरोधात गुन्हा दाखल  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

   

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.