दिवंगत विलास शिंदे यांचा मुलगा बनला सब इन्स्पेक्टर!


दिवंगत विलास शिंदे यांचा मुलगा बनला सब इन्स्पेक्टर!
SHARES

वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल दिवंगत विलास शिंदे (५२) यांचा मुलगा दीपेश याची मुंबई पोलीस दलात सब इन्स्पेक्टर पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. विलास शिंदे यांच्या पहिल्या स्मृतीदिनी गुरूवारी आयोजित श्रद्धांजलीपर कार्यक्रमात मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्या हस्ते दीपेशला नियुक्तीपत्र देण्यात आले.

एका इंग्रजी वृत्तपत्रातील वृत्तानुसार, पंचवीस वर्षांच्या दीपेशने इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीतून बीएसई केले आहे. हे नियुक्तीपत्र हाती पडताच त्याने सर्वप्रथम आयटी कंपनीचा राजीनामा दिला. दीपेशच्या नियुक्तीनंतर शिंदे कुटुंबातील तिसरी पिढी पोलीस दलात कार्यरत होणार आहे. दीपेशचे आजोबा विठोबा शिंदे (८०) मुंबई पोलीस दलातून असिस्टंट सब इन्स्पेक्टर म्हणून निवृत्त झाले होते. त्यानंतर विलास शिंदे वाहतूक पोलीस शाखेत कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होते.



थेट नियुक्ती

दीपेशची पोलीस दलात सब इन्स्पेक्टर पदावर थेट नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासाठी दीपेशच्या प्रकरणाबद्दल ‘महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन बोर्ड’ आणि मंत्रालय पातळीवर चर्चा करण्यात आली. त्याच्या शिक्षणाच्या पातळीनुसार त्याला क्लास २ ऑफिसरची श्रेणी देण्यात आली आहे. दीपेशला आता वर्षभराच्या पोलीस प्रशिक्षणासाठी नाशिकला जावे लागेल. पण त्याअगोदर त्याला मेडिकल टेस्ट द्यावी लागेल, असे मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी सांगितले.




सर्वोत्तम कामगिरीसाठी तयार

कर्तव्यावर असताना माझ्या वडिलांना जीव गमवावा लागला. त्यानंतर पुढील वर्षभराचा काळ आमच्या कुटुंबासाठी खूपच खडतर होता. पोलीस दलात सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी मी तयार आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी दीपेशने दिली.


अशी घडली होती घटना

पोलीस कॉन्स्टेबल दिवंगत विलास शिंदे २३ ऑगस्ट २०१६ रोजी खारजवळ कर्तव्यावर असताना त्यांनी १७ वर्षांच्या मुलाला हेल्मेटशिवाय गाडी चालवताना पकडले होते. त्याच्याकडे लायसन्सही नव्हते. त्याबाबत त्याची चौकशी करत असताना या अल्पवयीन आरोपीने अहमद कुरेशी या आपल्या भावाला बोलावून घेतले. या दोघांनीही शिंदे यांना धक्काबुक्की केली आणि अहमदने त्यांच्या डोक्यात रॉडने हल्ला करुन तेथून पळ काढला. या हल्ल्यात विलास शिंदे जबर जखमी झाले. त्यानंतर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु असताना ३१ ऑगस्ट २०१६ रोजी त्यांचा मृत्यू झाला.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा