सोन्याच्या हौसेनं राजस्थानमधल्या पुजाऱ्याला नेलं तुरूंगाच्या दारात

सोनं घालण्याची हौस पुरवण्यासाठी राजस्थानमधील पुजाऱ्यानं वर्षभरापूर्वी मालाडच्या स्वामी नारायण मंदिरात चोरी केली. चोरी करून हा पुजारी फरार झाला होता, पण अखेर एका वर्षानं या पुजाऱ्याला मालाड पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली आहे.

सोन्याच्या हौसेनं राजस्थानमधल्या पुजाऱ्याला नेलं तुरूंगाच्या दारात
SHARES

असं म्हणतात हौसेला मोल नसतं. त्यामुळेच काहीजण आपली हौस पुरवण्यासाठी, त्यातही न परवडणारी हौस पुरवण्यासाठी कोणत्याही थराला जातात. हेच असं काही घडलं आहे ते राजस्थानमधील एका पुजाऱ्याच्या बाबतीत. अंगावर तोळा-तोळा सोनं मिरवण्याऱ्या पुजाऱ्याच्या हौसेनं त्याला थेट गुन्हेगार बनवत तुरूंगाच्या दारात नेलं आहे. सोनं घालण्याची हौस पुरवण्यासाठी राजस्थानमधील पुजाऱ्यानं वर्षभरापूर्वी मालाडच्या स्वामी नारायण मंदिरात चोरी केली. चोरी करून हा पुजारी फरार झाला होता, पण अखेर एका वर्षानं या पुजाऱ्याला मालाड पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली आहे. दरम्यान अटक करण्यात आलेल्या या पुजाऱ्याविरोधात पुणे, कोल्हापुर, मुंबई आणि गुजरातमध्येही गुन्हे दाखल असल्याचं समोर आलं आहे.


मंदिराच्या ट्रस्टींशी सलगी

मूळचा राजस्थानचा रहिवाशी असलेला सुखदेव रोहित हा व्यवसायानं पुजारी आहे. त्याला सोन्याची मोठी हौस होती. हीच हौस पूर्ण करण्यासाठी सुखदेव पुजारी म्हणून अशा मंदिरांची निवड करायचा जिथं मोठ्या प्रमाणावर सोनं अर्पण केलं जातं. त्यानुसार तो नोव्हेंबर २०१७ मध्ये मुंबईतील मालाडमधील स्वामी नारायण मंदिरात पोहचला. मंदिराच्या ट्रस्टींशी सलगी करत तो तिथं राहू लागला. त्यानंतर त्यानं ट्रस्टींची आणि इतर सभासदांची मन जिंकून घेतली आणि मंदिरातच वास्तव्याला राहू लागला. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच एका रात्री सुखदेवनं मंदिरातील सोन्याचे दागिने घेऊन पळ काढला.


अडीच लाखांचे दागिने

सकाळी मंदिरातील देवदेवतांच्या अंगावर सोन्याचे दागिनेच दिसत नसल्यानं ट्रस्टी आणि सभासदांच्या पायाखालची वाळूच सरकली. त्यांनी सुखदेवला मंदिरात शोधण्यास सुरूवात केली. पण तो कुठंच सापडला नाही. त्यामुळे शेवटी ट्रस्टींनी मालाड पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी याबाबत गुन्हा नोंदवत सीसीटीव्हीचा तपास सुरू केला. त्यात सुखदेवनेंच दागिने चोरल्याचं स्पष्ट झालं. तर सुखदेवनं लंपास केलेल्या दागिन्यांची किंमत अडीच लाखांच्या वर होती. दरम्यान पोलीस गेल्या वर्षभरापासून सुखदेवचा शोध घेत होते.


अन्य ठिकाणच्या मंदिरात हातसफाई

पोलिसांनी सुखदेवचा कसून शोध घेतला असता सुखदेव राजस्थानमध्ये असल्याची माहिती मालाड पोलिसांना मिळाली. त्यानुसार मालाड पोलिसांनी राजस्थानमध्ये जाऊन त्याचा शोध घेत त्याला नुकतीच अटक केली आहे. सुखदेवनं राज्यातील अन्य ठिकाणच्या मंदिरातही हातसफाई केली आहे.त्यामुळे याअनुषंगानंही पोलिस सुखदेवचा तपास करत आहेत. तेव्हा सुखदेवच्या चौकशीतून चोरीच्या अनेक घटना समोर येण्याची शक्यता आहे.



हेही वाचा -

पंधरा वर्षांपासून गुंगारा देणारा आरोपी अखेर अटकेत

नवोदित अभिनेता राहुल दिक्षीतची आत्महत्या



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा