आशा गवळीवर अटकेची टांगती तलवार

नोटीस मिळूनही आशा गवळी चौकशीस हजर राहिल्या नाहीत. आशा गवळी यांनी खेड न्यायालयात अटक पूर्व जामीनासाठी अर्ज केला. त्यानुसार न्यायालयाने गवळी यांचा अर्ज स्वीकारला. मात्र न्यायालयाची मुदत संपल्यानंतर आशा गवळीला पुणे गुन्हे शाखेचे पोलिस या गुन्ह्यात अटक करण्याची शक्यता आहे.

आशा गवळीवर अटकेची टांगती तलवार
SHARES

कुख्यात गुंड अरूण गवळी याची पत्नी आशा गवळी उर्फ मम्मी यांच्यावर पुण्याच्या मनेसर पोलिस ठाण्यात एका व्यावसायिकाने खंडणीचा गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी पुण्याच्या गुन्हे शाखा पोलिसांनी गवळी गँगच्या ३ सदस्यांना अटक केली असून त्याच्या चौकशीतून आशा गवळी यांचं नाव पुढं आलं आहे. त्यानुसार पोलिसांनी आशा गवळी यांना चौकशीसाठी बोलावलं. मात्र चौकशीसाठी हजर न राहता अटक टाळण्यासाठी आशा गवळी यांनी थेट न्यायालयात धाव घेतली आहे.


काय आहे प्रकरण?

पुण्याच्या मंचर भागातील एका व्यावसायिकाला काही दिवसांपासून गवळी गँगकडून ५ लाखांच्या खंडणीसाठी फोन आणि मेसेज येत होते. एका व्यावसायिकाने तर त्याच्या वागजोली येथील कार्यालयात तिघांनी येऊन धमकावल्याची तक्रारही मंचर पोलिस ठाण्यात नोंदवली. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी त्याला दिली जात होती. या प्रकरणी व्यावसायिकाने गुन्हा नोंदवल्यानंतर हा गुन्हा अधिक तपासासाठी पुण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला.


आरोपी कोण?

या गुन्ह्यात पोलिसांनी गवळी गँगच्या मोबिन मोहम्मद मुजावर, सूरज राजेश यादव आणि बाळा सुदान पाठारे या तिघांना अटक केली. या तिघांपैकी मोबिन हा भायखळाच्या दगडी चाळीतील रहिवासी आहे. सूरज आशा गवळी यांच्या पुण्यातील वडगाव पीर येथील फार्महाऊसवर कामाला आहे. तर बाळा पाठारे हा पुण्यातील आखिल भारतीय सेनेचा युवा पदाधिकारी आहे.


नोटीस बजावली

पुण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुंबई पोलिसांशी पत्रव्यवहार करून आशा गवळी यांना हजर राहण्याबाबत नोटीस पाठवण्यासंबधी कळवलं. त्यानुसार आग्रीपाडा पोलिसांनी रविवारी सायंकाळी आशा गवळी यांना पोलिस ठाण्यात बोलवून त्यांना ४११(अ)(१) सीआरपीसी नुसार नोटीस बजावली.


अटकेची शक्यता

ही नोटीस मिळूनही आशा गवळी चौकशीस हजर राहिल्या नाहीत. आशा गवळी यांनी खेड न्यायालयात अटक पूर्व जामीनासाठी अर्ज केला. त्यानुसार न्यायालयाने गवळी यांचा अर्ज स्वीकारला. मात्र न्यायालयाची मुदत संपल्यानंतर आशा गवळीला पुणे गुन्हे शाखेचे पोलिस या गुन्ह्यात अटक करण्याची शक्यता आहे.



हेही वाचा- 

'डॅडी'नंतर 'मम्मी' पोलिसांच्या रडारवर!

१९९३ बाॅम्बस्फोटातील 'टकला' मुंबई पोलिसांच्या ताब्यात



Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा