बलात्कार पीडितेसोबत केलं लग्न, हायकोर्टाने रद्द केला गुन्हा

बलात्कार प्रकरणातील आरोपी आणि पीडितेचा विवाह झाला असून, ते एकत्र राहत आहेत, त्यामुळे महिलेच्या कल्याणाचा विचार करता, आरोपीविरुद्ध खटला चालवण्याने कोणताही हेतू साध्य होणार नाही', असं निरीक्षण नोंदवत मुंबई हायकोर्टाने आरोपीविरोधातील गुन्हा रद्द केला.

बलात्कार पीडितेसोबत केलं लग्न, हायकोर्टाने रद्द केला गुन्हा
SHARES

आरोपीने बलात्कार पीडितेसोबत विवाह केल्याने तसंच पीडितेनेही आमचा संसार आनंदात सुरू असल्याचं न्यायालयाला सांगितल्याने मुंबई उच्च न्यायालयाने आरोपीविरोधातील बलात्काराचा गुन्हा रद्द केला आहे. 'बलात्कार प्रकरणातील आरोपी आणि पीडितेचा विवाह झाला असून, ते एकत्र राहत आहेत, त्यामुळे महिलेच्या कल्याणाचा विचार करता, आरोपीविरुद्ध खटला चालवण्याने कोणताही हेतू साध्य होणार नाही', असं निरीक्षण नोंदवत न्या. रणजीत मोरे आणि न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाने आरोपीविरोधातील एफआयआर रद्द करण्याचे आदेश दिले.

 

काय होतं प्रकरण?

सदर बलात्कार प्रकरणातील आरोपी आणि पीडित महिला या दोघांचेही प्रेमसंबंध होते. दोघांनीही एकमेकांच्या संमतीने शरीरसंबंध ठेवले होते. तसंच त्यावेळी दोघेही प्रौढ होते. परंतु आरोपीने पीडित महिलेसोबत लग्न करण्यास नकार दिल्याने  गेल्या वर्षी महिलेने आरोपीविरोधात भादंसं च्या कलम ३७६ अन्वये बलात्कार व कलम ४२० अन्वये फसवणुकीच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवला. 

 

न्यायालयात प्रतिज्ञापत्र

मात्र काही महिन्यांनी दोघांच्याही कुटुंबीयांच्या मध्यस्तीने त्यांनी १९ जानेवारीला लग्न केलं. लग्नानंतर त्यांनी एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला. विशेष विवाह कायद्यातील तरतुदीअंतर्गत विवाहाचं प्रमाणपत्र जोडत पीडित महिलेने 'आरोपीसोबत विवाह झाल्यानंतर मी आता आनंदाने त्याच्यासोबत राहत असून एफआयआर रद्द करण्यासाठी माझी संमती आहे', असं प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केलं.

 

खटला रद्द करणं योग्य

तसं पाहता आरोपी आणि पीडितेमध्ये तडजोड होऊनही बलात्काराचा गुन्हा रद्द होत नाही. पीडिता दबावाला बळी पडूनही अशी मागणी करू शकते, असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात काही मार्गदर्शक तत्वेही आखून दिली आहेत. परंतु या प्रकरणात दोघेही विवाह करून एकत्र राहत असल्याने महिलेच्या कल्याणाचा विचार करता आरोपीविरुद्ध खटला रद्द करणे योग्य होईल, असं निरीक्षण खंडपीठाने नोंदवलं.  



हेही वाचा-

३ मिनिटांत कार चोरणाऱ्या अट्टल चोराला अटक

कुख्यात गुंड अरूण गवळी मुंबईत, २८ दिवसांच्या सुट्टीवर


 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा