दुर्मिळ व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या ३ जणांच्या टोळीला ठाण्याच्या क्राईम ब्रॅंच पथकानं अटक केली आहे. त्याचप्रमाणं या टोळीकडून पोलिसांनी २२ कोटीचा मुद्देमाल जप्त केला असून या ३ जणांना ६ तारखेपर्यंत पोलिस कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. काशिनाथ तुकाराम पवार (५०), दिलीप महादेव बिर्जे (४९) आणि ज्ञानेश्वर गोविंद मोरे (४०) अशी या आरोपींची नावे आहेत.
हे तिन्ही आरोपी मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास टोयोटा कंपनीच्या गाडीतून तस्करीचा माल घेऊन जात होते. त्यांच्या गाडीत खवल्या मांजरांची खवले आणि व्हेल माशाची उलटी असा तस्करीचा माल होता. हा माल ते विक्रीसाठी कळव्यातील खारेगांव येथील अमित गार्डन जवळ येणार असल्याची गोपनीय माहिती ठाण्याच्या गुन्हे शाखा-१ चे सह पोलिस निरिक्षक संदीप बागुल यांनी मिळाली होती.
या गोपनीय माहितीच्या आधारे ठाण्याच्या गुन्हे शाखा-१ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे आणि त्यांच्या पथकाने अमित गार्डनजवळ सापळा रचून तिन्ही आरोपींना अटक केली.
या आरोपींकडून पोलिसांनी खवले मांजराच्या शरीरावरील लहान मोठ्या आकाराचे ६ किलो खवले जप्त केले असून त्याची किंमत २० लाख रुपये आहे. तसंच व्हेल माशाच्या उलटीपासून तयार झालेला १०.९०० किलोचा एका बॅगमध्ये गुंडाळून ठेवलेला दगड पोलिसांनी जप्त केला आहे. या दगडाची किंमत अंदाजे २० कोटी रुपये एवढी आहे.
या प्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींविरोधात कळवा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून वन्य जीन संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९, ३९, ४८(ए)५१ या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा-
मुंबईच्या समुद्रात कोट्यवधींची तेल तस्करी, तेल माफिया राजू पंडितसह दोघांना अटक
स्टंटबाजी बेतली जीवावर, तरूणी ट्रेनखाली येताना थोडक्यात बचावली