मुंबई, ठाण्यात अंडरवर्ल्ड पुन्हा सक्रीय?


मुंबई, ठाण्यात अंडरवर्ल्ड पुन्हा सक्रीय?
SHARES

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी मागितल्याप्रकरणी अटक झाल्यानं मुंबईसह ठाण्यात अंडरवर्ल्ड पुन्हा एकदा सक्रीय झालं आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

न्यायालयासमोर हजर केल्यावर इक्बाल कासकर याला ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून गरज भासल्यास त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असं गृहराज्य मंत्री रणजीत पाटील यांनी मंगळवारी मंत्रालयात सांगितलं. 

इक्बालच्या चौकशीतून १० ते १५ बिल्डर्स दाऊदच्या निशाण्यावर असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे. यापैकी काही बिल्डर्सकडून खंडणी वसूल करण्यात आली होती, तर काही बिल्डर्सला खंडणीसाठी धमकवण्यात येत होतं. नवी मुंबईतील एक बिल्डर या धमक्यांना घाबरून पळून गेल्याचंही ठाणे पोलिसांनी सांगितलं आहे.


ज्वेलर्स, नगरसेवकही निशाण्यावर

मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील बिल्डर्ससोबतच ज्वेलर्सही इक्बालच्या निशाण्यावर होते. यापैकी काहींकडून इक्बलनं पैसे, तर एका बिल्डरकडून खंडणीच्या रुपात ३ फ्लॅटही उकळल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली.

या सगळ्या प्रकरणात दाऊदचा कितपत हात आहे? या संदर्भात तपास सुरू असून तसं आढळून आल्यास दाऊदवर त्वरीत गुन्हा दाखल करण्यात येईल, असं ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी म्हटलं आहे.

या खंडणी प्रकरणात काही नगरसेवकांची तसेच नेत्यांची नावेही समोर आली आहेत. त्याचाही सध्या ठाणे पोलीस तपास करत आहेत.


नेमकी का झाली इक्बालला अटक?

२०१३ मध्ये एका बांधकाम व्यावसायिकाने घोडबंदर रोड इथं जमीन विकत घेतली होती. या जमिनीवर त्यानं बांधकाम सुरु करताच इक्बालची त्यावर नजर पडली. काही जमीन मालकांना हाताशी धरून त्यांच्या वाटेची जमीन आपण विकत घेतल्याचा दावा इक्बाल कासकर करू लागला. 'सेटलमेंट' म्हणून या बांधकाम व्यावसायिकाकडे इमारतीतील ४ फ्लॅट आणि ३० लाख रूपयांची खंडणी मागण्यात आली. खंडणी न दिल्यास बांधकाम व्यावसायिकाला ठार मारण्याची धमकी देण्यात आली.

एवढंच नव्हे, तर इक्बालच्या हस्तकांनी या बांधकाम व्यावसायिकाला साईटवर तसंच ऑफिसमध्ये जाऊन धमकावलं देखील.

ठरल्याप्रमाणं बांधकाम व्यावसायिकानं सुरूवातीला १ फ्लॅट इक्बाल कासकरच्या हस्तकाच्या नावे केला, तर उर्वरित ३ फ्लॅट विकून आलेली रक्कम त्याने इक्बालपर्यंत पोहोचवली. पण इक्बालची भूख मिटण्याचं नाव घेत नव्हती. त्यानं या बांधकाम व्यावसायिकाला धमकावणं सुरुच ठेवलं. शेवटी या बांधकाम व्यावसायिकानं ठाणे खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार केली.

या प्रकरणाचा तपास एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्याकडं होता. पोलीस दलात काही दिवसांपूर्वीच पुनरागमन केलेल्या शर्माकडं सध्या ठाणे खंडणी विरोधी पथकाची धुरा सोपवण्यात आली आहे.

१८ सप्टेंबरला इक्बाल कासकर विरोधात गुन्हा दाखल होताच प्रदीप शर्मा यांच्या नेतृत्वाखाली ठाणे खंडणी विरोधी पथकानं मुंबईच्या दिशेने कूच केली. इक्बाल त्याच्या हस्तकांसह त्याच्या बहिणीच्या म्हणजेच हसीना पारकरच्या घरी लपल्याची पक्की माहिती शर्मांकडे होती. सोमवारी रात्री ठाणे खंडणी विरोधी पथक नागपाड्यातील हसीना पारकरच्या गार्डन हॉल अपार्टमेंट इथं दाखल झाले आणि पथकानं इक्बालला त्याच्या साथीदारांसह अटक केली.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा