'संधी'साधू! २६ कोटींचे डायमंड चोरून चोर शिरला युपीतील कुंभ मेळ्यात

मुंबईच्या बीकेसीतील भारत डायमंड मार्केटमधून २६ कोटी ९१ लाखांचे डायमंड चोरून इलाहबादमधील कुंभ मेळ्यात साधूच्या वेशात लपणार्या 'संधी'साधूला अखेर मुंबई पोलिसांच्या विशेष पथकानं नुकतीच अटक केली आहे. या संधीसाधूबरोबरच त्याचे सहकारीही पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत.

'संधी'साधू! २६ कोटींचे डायमंड चोरून चोर शिरला युपीतील कुंभ मेळ्यात
SHARES

हौसे नवसे आणि गवसे असे सगळेच कोणत्याही जत्रेप्रमाणेच कुंभ मेळ्यातही असतात. पण याच कुंभ मेळ्यात एखादा चोर साधूच्या वेशात लपला होता असं सांगितंल तर अनेकांना खरं वाटणार नाही. पण हे खरं आहे. मुंबईच्या बीकेसीतील भारत डायमंड मार्केटमधून २६ कोटी ९१ लाखांचे डायमंड चोरून इलाहबादमधील कुंभ मेळ्यात साधूच्या वेशात लपणाऱ्या 'संधी'साधूला अखेर मुंबई पोलिसांच्या विशेष पथकानं नुकतीच अटक केली आहे. या संधीसाधूबरोबरच त्याचे सहकारीही पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. यतीन परेश फिचाडीया (३१ वर्षे) असं या संधीसाधूचं नाव आहे.


डायमंड मार्केटमध्ये दलालीचं काम

फिचाडीया हा बीकेसीतील डायमंड मार्केटमध्ये दलालीचं काम करायचा. पण ३ महिन्यांपूर्वी पैशांच्या हव्यासापोटी त्यानं चोरीचा कट रचला. एका डायमंड व्यापाऱ्याकडून २६ कोटी ९१ लाखांचे डायमंड विक्री करण्याच्या बहाण्यानं घेऊन गेला. पण या डायमंडची विक्री करण्याएेवजी त्यांनं हे डायमंड आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं हडप केले. तर आपलं बिंग फुटू नये आणि आपण कशातही अडकू नये यासाठी फिचाडीयानं एक बनावही रचला आणि हा बनाव होता आपल्याला लुटल्याचा. एका व्यक्तिनं आपल्याकडून डायमंड लुटल्याचं त्यानं व्यापाऱ्याला सांगितलं. इतकंच नव्हे तर एक तोतया कायदेशीर सल्लागार उभा करत आपल्याला खरोखरच लुटलं गेल्याचं तो भासवू लागला.


मुंबईतून काढला पळ

पुढं त्यानं या तोतया कायदेशीर सल्लागाराच्या सांगण्यानुसार पोलिसांत आपल्याला अनोळखी व्यक्तिनं लुटल्याची तक्रारही विरार पोलिस ठाण्यात दाखल केली. मात्र जसं हे प्रकरण अंगाशी येऊ लागलं तसं आपलं बिंग फुटण्याच्या भितीनं फिचाडीयानं आपला मोबाईल बंद करत मुंबईतून पळ काढला. त्यानंतर अखेर या व्यापार्यांनं बीकेसी पोलिस ठाण्यात धाव घेत फिचाडीयाविरोधात ११ डिसेंबर २०१८ रोजी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी फिचाडीयाचा शोध सुरू केला. पण तो काही सापडत नव्हता.


पोलिसांचं विशेष पथक

शेवटी या गुन्ह्याचं स्वरूप आणि व्याप्ती लक्षात घेत पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त डाॅ. मनोज कुुमार शर्मा आणि परिमंडळ-८ चे पोलिस उप आयुक्त यांनी पोलिसांचं एक विशेष पथक तयार केलं. या पथकानं फिचोडीयाचा कसून तपास केला असता त्याचे साथीदार आणि सहआरोपी केतन परमार, इम्रान खान पोलिसांच्या गळाला लागले.


कुंभ मेळ्यात साधूच्या वेशात राहायचा

केतन परमार आणि इम्रान खान याची चौकशी केली असता फिचोडीया उत्तर प्रदेशातील इलाहबाद इथं सुरू असलेल्या कुंभ मेळ्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी थेट कुंभ मेळा गाठला. कुंभ मेळ्यात साधूच्या वेशात तो लपल्याचं समजल्यानंतर पोलिसांच्या विशेष पथकानं मोठ्या शिताफिनं सापळा रचत संधीसाधू फिचाडीयाला ताब्यात घेत मुंबईत आणलं आहे. दरम्यान या संधीसाधू आणि त्याच्या साथीदारांकडून पोलिसांनी २० कोटी ३८ लाखांचा मुद्देमाल अर्थात डायमंड हस्तगत केले आहेत. पोलिस उपायुक्त अनिल कुंभारे यांनी गुरूवारी एक पत्रकार परिषद घेत फिचाडीया कशी अटक केली याची माहिती दिली आहे. दरम्यान फिचाडीया मुंबईतून फरार झाल्यापासून वेश बदलून अजमेर, राजस्थान, दिल्ली, चंदीगड, वृदांवन, आग्रा, बिहार, ओरीसा, भुवनेश्वर आणि अन्य ठिकाणी गेल्याचंही चौकशीत समोर आलं आहे.



हेही वाचा -

अब की बार 'बेरोजगारी' की मार, बेरोजगारीचा दर ६.१ टक्क्यांवर

राणीच्या बागेत फुलांची सनई, बासरी आणि गिटार



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा