विमान कंपनीत नोकरी देण्याच्या नावाखाली तरुणीची फसवणूक

तरुणांना हेरून त्यांना परदेशात नामांकित कंपनीत माेठ्या पगाराची नाेकरी मिळवून देण्याच्या अामिषाने फसवण्याचे प्रकार वाढत अाहेत. याचप्रकारे माटुंगामधील २१ वर्षीय तरुणीला इंडिगो एअरलाइन्समध्ये चांगल्या पगाराची नोकरी देण्याच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी तब्बल ४४ हजार ८०० रुपयांना गंडा घातल्याचं उघडकीस अालं आहे.

विमान कंपनीत नोकरी देण्याच्या नावाखाली तरुणीची फसवणूक
SHARES

इंजिनीअर, डाॅक्टर, हाॅटेल मॅनेजमेंट, उच्च पदवीधर झाल्यानंतर गलेलठ्ठ पगाराची नाेकरी मिळवण्यासाठी अनेक तरुण प्रयत्नशील असतात. यातील बहुतांशजण देशात काम करण्यापेक्षा परदेशात जाऊन अधिक पैसा मिळवण्यासाठी तयार असतात. अशा तरुणांना हेरून त्यांना परदेशात नामांकित कंपनीत माेठ्या पगाराची नाेकरी मिळवून देण्याच्या अामिषाने फसवण्याचे प्रकार वाढत अाहेत. याचप्रकारे माटुंगामधील २१ वर्षीय तरुणीला इंडिगो एअरलाइन्समध्ये चांगल्या पगाराची नोकरी देण्याच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी तब्बल ४४ हजार ८०० रुपयांना गंडा घातल्याचं उघडकीस अालं आहे. या प्रकरणी माटुंगा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली अाहे.


नोकरीचं अामिष

माटुंगाच्या रामेश्वर रोडवरील तेलंग भवन इथं आपल्या आईसह राहणारी तन्वी आंबरे या तरुणीने चांगल्या नोकरीसाठी ७ आॅक्टोबर २०१८ मध्ये शाईन डाॅट काॅम या नोकरी संकेतस्थळावर तिचा बायोडेटा अपलोड केला होता. त्यानंतर दुसऱ्यात दिवशी तिला इंडिगो विमानवाहू कंपनीतून मेल आला होता. त्यात तुमचे प्रोफाइल हवाईसुंदरीसाठी लिस्टेड केल्याचं लिहिलं होते.


फोनवरून सिलेक्शन

त्या खाली दिलेल्या नंबरवर तन्वीने फोन केला असता. सचिन बावकर या व्यक्तीने तिला तिचं सिलेक्शन झाल्याची कल्पना दिली. तसंच सिक्युरिटी डिपाॅझिट म्हणून ९८०० भरण्यास सांगितलं. हे पैसे पुन्हा परत मिळणार असल्याची ग्वाहीही त्याने दिली. त्यानुसार तन्वीने सचिनच्या खात्यावर पैसे भरले.

त्यानंतर २ दिवसांनी सचिनने फोनकरून तुमचं प्रोफाइल सिलेक्ट झाल्याचं तिला कळवलं. सिनियर आॅफिसर रोहित कपूर हे तुमची फोनवर इंटरह्यू घेणार असल्याचं कळवलं. त्यानंतर काही तासांनी रोहित नावाच्या व्यक्तीचा फोन आला. फोनवर विचारलेल्या प्रश्नांची तन्वीने उत्तरे दिली. या प्रक्रियेतही सिलेक्ट झाल्यावर कंपनीशी ३५ हजार रुपयांचा बाॅण्ड करावा लागेल. असं त्यांनी तन्वीला कळवलं.


फोन बंद

रोहितने तिला संजय शर्मा या व्यक्तीशी संपर्क करण्यास सांगितलं. संजयकडे पुन्हा या भरतीबाबत तन्वीने चौकशी केली असता. त्याने तिला खात्री पटवून दिली. त्यानंतर तन्वीने पुन्हा ३५ हजार रुपये संजयने दिलेल्या खात्यावर भरले. त्यानंतर संजयने अपाॅईंटमेंट लेटरची साॅफ्ट काॅपी पाठवून कंपनीच्या सांताक्रूझ येथील कार्यालयात ३० आॅक्टोबर २०१८ रोजी बोलावलं. त्यानुसार तन्वी या कंपनीच्या कार्यालयात अपाॅईंटमेंट लेटर घेऊन गेल्या असता. सचिन बावकर यांना फोन केला. मात्र त्याचा फोन बंद लागत होता.


नावाचा गैरवापर

त्यामुळे कंपनीच्या कार्यालयात चौकशी केली असता. अशी कोणतीही भरती निघाली नसल्याचे इंडिगोच्या कार्यालयातून सांगितल्यानंतर तन्वीच्या पायाखालची जमीनच सरकली. तसंच सचिन बावकर यांच्याबद्दल माहिती विचारली असता. सचिन बावकर हे इंडिगोत काम करतात. मात्र तन्वी सोबत बोलणाऱ्यांनी सचिन यांच्या नावाचा गैरवापर केल्याचं कालांतराने उघडकीस आलं. या प्रकरणी तन्वीने माटुंगा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.


गुन्ह्यात ७४ टक्के वाढ

मागील ६ महिन्यांत अशा प्रकारच्या १५१ गुन्ह्यांची नोंद झाली असून ४६ गुन्ह्यात आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. तर मागील वर्षी जूनपर्यंत १०९ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. यामधील फक्त २४ गुन्हे उघडकीस आले अाहेत. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत अशा प्रकारच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात तब्बल ७४ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. अशा प्रकारचे नोकरी संदर्भातील ई-मेल आल्यास नागरिकांनी वस्तुस्थिती पडताळावी, असं आवाहन सायबर पोलिसांनी केलं आहे.



हेही वाचा-

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या

समलैंगिक संबंधातून मित्राची हत्या



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा