मुलीचे अपहरण करणारी 'ती' महिला गजाआड

  Bandra East
  मुलीचे अपहरण करणारी 'ती' महिला गजाआड
  मुंबई  -  

  तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण करुन तिला साडेतीन हजार रुपयांना विकल्याप्रकरणी जाहिरा दिन मोहम्मद शेख(45) या महिलेला निर्मल नगर पोलिसांनी अटक केली आहे. जाहिरा लहान मुलांना चोरण्यात पटाईत असून, तिने आणखी अनेक मुलांचे अपहरण करुन विकल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

  फेब्रुवारी महिन्यात वांद्रे येथील बेहराम पाड्यात राहणारी शिफा शेख (3) नावाची मुलगी इमारतीच्या खाली खेळत असताना अचानक बेपत्ता झाली होती. इमारतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तिला एक महिला घेऊन जात असल्याचे स्पष्ट दिसत होते. पण ही महिला कोण? हे मात्र कुणालाच माहीत नव्हते.

  दरम्यान, मुलीच्या अपहरणानंतर पोलिसयंत्रणा तात्काळ कामाला लागली. पोलिसांना वांद्रे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये शिफा आणि तिला चोरणारी महिला दिसली. तिने सीएसएमटीकडे जाणारी ट्रेन पकडली आणि त्यानंतर दोघेही किंग्ज सर्कल स्टेशनला उतरल्याचेही सीसीटीव्हीत पोलिसांना दिसले. पोलिसांनी या सीसीटीव्हीच्या आधारे किंग्ज सर्कलवर आपले लक्ष केंद्रित केले. काही दिवसांतच पोलिसांना यशदेखील मिळाले. अपहरण झालेली मुलगी ही गुलशनजहाँ फहिम अन्सारी(32) आणि तिचा पती फहिम अन्सारी यांच्याकडे असल्याचे पोलिसांना समजताच पोलिसांनी या दोघांनाही अटक करुन मुलीची सुटका करून घरच्यांच्या ताब्यात दिले.

  या दोघांनाही जाहिरा दिन मोहम्मद शेखने साडे तीन हजार रुपयांना विकल्याची कबुली त्यांनी पोलिस तपासात दिली. विशेष म्हणजे, एवढे सगळे होऊन देखील पोलिसांना मुलगी चोरणाऱ्या जाहिरा दिन मोहम्मदचा मात्र शोध कुठेही लागला नव्हता.


  हेही वाचा - 

  चिमुकलीचं अपहरण सीसीटीव्हीत कैद


  या महिलेच्या शोधात आम्ही मुंबईच काय, तर ठाणे, नवी मुंबई पिंजून काढली. विशेष म्हणजे पनवेल, कल्याण पासून थेट हाजीमलंग पर्यंत जाऊन आम्ही या महिलेला शोधण्याचा प्रयत्न केला. पण सगळे फोल ठरले. मात्र शेवटी सोमवारी आम्हाला माहिती मिळाली की, ही महिला घरातून वांद्र्याच्या दिशेने निघाली आहे. आम्ही निर्मलनगर, खेरवाडी, बेहेरामपाडा येथे सापळा लावला. त्यानंतर 3 तासांच्या प्रयत्नांनंतर ही महिला आम्हाला सापडली.


  विजय धोत्रे, तपास अधिकारी

  दरम्यान, सोमवारी देखील ही महिला मूल चोरण्याच्या उद्देशाने आल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या महिलेला मंगळवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, तिला 16 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.