Advertisement

शिवराज्याभिषेकाच्या चित्ररथाने केलं मंत्रमुग्ध


शिवराज्याभिषेकाच्या चित्ररथाने केलं मंत्रमुग्ध
SHARES

प्रजासत्ता दिनी राजपथावर १४ राज्यांच्या चित्ररथाने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं. यांत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचा चित्ररथ महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.

राजपथावर एकूण १४ राज्यांसह केंद्र सरकारच्या ७ खात्यांचे आणि भारत-आशियान राष्ट्रांचे संबंध दाखवणारे २ चित्ररथ असे एकूण २३ चित्ररथ उतरले होते. त्यात महाराष्ट्राचाही चित्ररथ होता.


काय विशेष?

हा चित्ररथ ज्येष्ठ कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आला होता. किल्ल्याच्या प्रतिकृतीतल्या या चित्ररथावर सुरूवातीला शिवाजी महाराजांची अश्वारूढ प्रतिकृती असून त्याभाेवती दोन तोफा, ध्वज, तुतारी आणि मावळे दाखवण्यात आले होते. तर मध्यभागी रायगडाची प्रतिकृती साकारण्यात आली होती.

त्यात शिवराज्याभिषेकाचा सोहळा दाखवण्यात आला होता. मेघडंबरीतील सिंहासनावर बसलेले छत्रपती त्यांना आभूषणे देणारा दरबारी, शेजारी गागाभट्ट, सोयराबाई आणि संभाजीराजे, मागच्या भागात राजमाता जिजाऊ, चित्ररथाच्या दोन्ही बाजूला राजमुद्रा, होन, शिवराई, अशा सजावटीने सर्वांनाच खिळवून ठेवलं.

‘तेज तम अंस पर । कान्ह जिमि कंस पर। त्यों मलिच्छ बंस पर । सेर सिवराज है । या कविराज भूषण यांच्या वीररसाने भरलेल्या काव्याच्या उद्घोषात महाराष्ट्राचा चित्ररथ राजपथावर आला. छत्रपतींच्या पराक्रमाची कीर्ती सांगणारा हा चित्ररथ राजपथावर येताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याचं स्वागत केलं.

संबंधित विषय
Advertisement